आरमाेरी तालुक्यात २३१.८० हेक्टर क्षेत्रात हाेणार भुईमूग पिकाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 23:15 IST2022-10-28T23:14:44+5:302022-10-28T23:15:30+5:30
नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

आरमाेरी तालुक्यात २३१.८० हेक्टर क्षेत्रात हाेणार भुईमूग पिकाची लागवड
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक असून, काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्वदेखील वाढत आहे. या पिकाला निरनिराळ्या हवामानात जुळून घेण्याची क्षमता असल्याने या पिकाचे दिवसेंदिवस लागवड क्षेत्रदेखील वाढत आहे. सन २०२१ -२२ या वर्षात रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यात भुईमूग पिकाचे लागवड क्षेत्र २३१.८० हेक्टर क्षेत्र असून, यंदा गडचिराेली जिल्ह्यातदेखील भुईमुगाचा पेरा वाढणार आहे.
यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने बाह्य मशागतीच्या कामाला उशीर झाला. १५ ऑक्टोबरपर्यंत पेरणी झाल्यास फुलाचा कडाक्याच्या थंडीचा काळ सापडत नाही त्यामुळे चांगले उत्पादन येते. पण या वर्षात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रबी पिकाला लागवडीसाठी उशीर झाला. या वर्षात आक्टोबर महिना संपत आला तरी अजूनपर्यंत काही शेतकरी बाह्य मशागतीच्या नांगरणीचे काम करीत आहेत. उशीर झाला असला तरी या उत्पादनात काही फरक पडणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
मध्यम, चांगल्या, भुसभुशीत चिकण मातीच्या जमिनीत हे पीक चांगले येत असल्याने या स्वरूपाच्या मातीचा नदीकाठ खोब्रागडी, वैलोचना, सती नदीला लाभला. या तिन्ही नद्या कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी तालुक्यांतील काही गावांजवळून वाहतात. या नद्यांच्या किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील कढाेली, सावरखेडा, कराडी, सोनेरांगी, खरकाडा, भगवानपूर, वाढोणा या गावांत तर आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, करपडा, मोहझरी, सुकाळा या नदीकाठाच्या गावांत मोठ्या प्रमाणात भुईमुगाचे उत्पादन घेतले जाते.
भुईमूग हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या तेलबियांची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्याला चांगला भाव मिळत असून, भुईमूग उत्पादक शेतकरी आता आर्थिक उन्नतीकडे वाटचाल करत आहेत, म्हणून या पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
शेतकऱ्यांनी परंपरागत भुईमुगाचे बियाणे न वापरता सुधारित वाण तसेच टपोरे दाण्यांचे बियाणे वापरल्यास उत्पादन भरघोस येते. म्हणून शेतकऱ्यांनी आता भुईमुगाच्या नव्या शेतीकडे वळावे. या बियांना बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च भरून तर निघतेच, शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धीदेखील होते.
- जोत्स्ना घरत, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी