लोकाभिमुख विकासासाठी शासन कटिबद्ध
By Admin | Updated: January 27, 2015 23:32 IST2015-01-27T23:32:53+5:302015-01-27T23:32:53+5:30
विकासाची फळे शेवटच्या माणसाला चाखता यावी, यासाठी लोकाभिमुख प्रशासन व पारदर्शक कार्यप्रणाली शासनाद्वारे अंगिकारण्यात येत आहे. लोकाभिमुख विकासासाठी शासन

लोकाभिमुख विकासासाठी शासन कटिबद्ध
पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण
गडचिरोली : विकासाची फळे शेवटच्या माणसाला चाखता यावी, यासाठी लोकाभिमुख प्रशासन व पारदर्शक कार्यप्रणाली शासनाद्वारे अंगिकारण्यात येत आहे. लोकाभिमुख विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. यावेळी शौर्य पुरस्कार प्राप्त पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष निर्मला मडके, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, विशेष पोलीस उप महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राजकुमार शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
नक्षलवाद्यांशी लढा देऊन आपल्या प्राणाची पर्वा न करता, मोठ्या ध्येयाने कर्तव्य बजाविणाऱ्या आणि उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले. त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रपतीचे पोलीस शौर्य पदक शहीद पोलीस हवालदार गणपत नेवरू मडावी यांना जाहीर झाले. सदर शौर्य पदक त्यांच्या पत्नी मिना गणपत मडावी यांनी स्वीकारले. त्याचबरोबर पोलीस शौर्य पदकाचे मानकरी ठरलेले शहीद नाईक पोलीस शिपाई गिरीधर नागो आत्राम यांचे शौर्य पदक त्यांच्या पत्नी छबुताई गिरीधर आत्राम यांनी स्वीकारले. तर पोलीस शिपाई सुनिल तुकडू मडावी यांचा शौर्य पदक त्यांच्या आईवडिलांनी स्वीकारला. यावेळी त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला. त्याचबरोबर पोलीस शौर्य पदक तत्कालीन गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश व्यंकट वाघमारे, नापोशि सदाशिव लखमा मडावी, गंगाधर मदनया सिडाम, विनोद मेसो हिचामी, इंदरशहा वासुदेव सेडमेक, पोलीस शिपाई मुरलीधर सखाराम वेलादी, पोलीस उपनिरीक्षक अतुल श्रावण तवाडे, अंकुश शिवाजी माने यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मंगेश देशमुख, जिल्हा गुणवंत क्रीडा पुरस्कार करिश्मा भोयर, जिल्हा युवा पुरस्कार कल्पतरू बहुउद्देशिय संस्थेचे कृणाल पडालवार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रतिभा प्रभाकर चौधरी व प्रा. नीलिमा कर्मजीत सिंह यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक विनोद दशमुखे व ओमप्रकाश संग्रामे तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)