गडचिरोली : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत सार्वजनिक विद्यापीठांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘सेवाकर्मी’ उपक्रमाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय गुणांकनात येथील गोंडवाना विद्यापीठाने सर्वांना मागे टाकत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आकृतीबंध, सेवाप्रवेश नियमांची अंमलबजावणी, सर्व संवर्गांची अद्ययावत जेष्ठता सूची, सरळसेवा व पदोन्नती नियुक्तीची स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा प्रकरणे, आयजीओटी पोर्टलवर प्रशिक्षण नोंदणी व पाच कोर्स पूर्णता, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक डिजिटल करणे, कार्यालयीन प्रक्रिया अधिक गतिमान करणे या सर्व घटकांनी गोंडवाना विद्यापीठाला राज्यात अव्वल क्रमांक मिळवून दिला.
या अभूतपूर्व कामगिरीनंतर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुखांचे स्वागत केले. ते म्हणाले, एकत्रित परिश्रमाचे हे फलित आहे.प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार सेवा देणे हीच आमची बांधिलकी असून पुढील काळातही उत्कृष्टतेचा हा स्तर अधिक उंचावत ठेवणार आहोत. विद्यापीठाची सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रशासनिक शिस्त यामुळे ‘सेवाकर्मी’ उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करता आली, असे त्यांनी सांगितले.
गुणवत्तेसह प्रशासकीय कार्यक्षमतेची चर्चा
गोंडवाना विद्यापीठ राज्यात प्रथम क्रमांकावर आलेल्याने विद्यापीठात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनापासून ते कर्मचारीवर्गापर्यंत सर्वांनी समाधान व्यक्त केले असून, या यशामुळे गडचिरोली–चंद्रपूर जिल्ह्यांतील उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रशासनिक कार्यक्षमता याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा
रासेयो विभागाला राज्यशासनाचा पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील दोन रासेयो पुरस्कार, वेळेत निकाल जाहीर केल्याबद्दल राज्यपालांचे प्रशस्तीपत्र, ग्रामसभा सक्षमीकरणाच्या प्रकल्पाला भारत सरकारचा ‘फिक्की’ पुरस्कार, भारत सरकारच्या ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यात द्वितीय क्रमांक उल्लेखनीय कामगिरीच्या या श्रृंखलेत आता सेवाकर्मी गुणांकनात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची भर पडली आहे.
Web Summary : Gondwana University excelled in the 'Sevakarm' initiative, securing the top rank in Maharashtra. This achievement reflects efficient administration, digital service records, and timely execution of employee-related processes, enhancing the university's reputation and setting a new standard in higher education.
Web Summary : गोंडवाना विश्वविद्यालय ने 'सेवकर्म' पहल में उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए महाराष्ट्र में शीर्ष स्थान प्राप्त किया। यह उपलब्धि कुशल प्रशासन, डिजिटल सेवा रिकॉर्ड और कर्मचारी संबंधी प्रक्रियाओं के समय पर निष्पादन को दर्शाती है, जिससे विश्वविद्यालय की प्रतिष्ठा बढ़ी है।