गोंडवाना विद्यापीठाने दिवाळीच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या; 'असे' आहे नवीन वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:38 IST2025-10-24T16:17:11+5:302025-10-24T16:38:31+5:30
मिळाला विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांना दिलासा : पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य परीक्षेनंतर १५ दिवसांच्या आत घेण्याचे ठरले होते.

Gondwana University postpones Diwali winter exams; 'This is' the new schedule
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी २०२५ च्या परीक्षा दिवाळीच्या काळात घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे विद्यापीठाने परीक्षा २० दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीनंतर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असून, प्राध्यापक व महाविद्यालयांनाही शैक्षणिक तयारीसाठी दिलासा मिळाला आहे.
नवीन परिपत्रकानुसार हिवाळी २०२५ च्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होतील. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केले जाईल. हा निर्णय १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्या आदेशानुसार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल
पूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य परीक्षेनंतर १५ दिवसांच्या आत घेण्याचे ठरले होते. मात्र आता सर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे, प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घेण्यात येतील. ज्या महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षेचे पत्र आधीच मिळाले आहे त्यांनी तेच पत्र ग्राह्य धरावे, फक्त नवीन वेळापत्रकानुसार बदल स्वीकारावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.