आश्रमशाळांत ‘जीके’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:24+5:30
जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते.

आश्रमशाळांत ‘जीके’ परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये प्रयास उपक्रमांतर्गत २३ आॅगस्टला वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान (जी.के.) तिमाही स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला दुर्गम भागातील १०२ आश्रमशाळांमधील २१ हजार ५४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले.
जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. या शिक्षकांमार्फत सदर प्रश्न दैैनंदिन परिपाठाच्या माध्यमातून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना माहिती करून दिले जात होते. या सर्व प्रश्नातून ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान तिमाही परीक्षेसाठी देण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास ३ हजार १०० रूपये, द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्यास २ हजार १०० व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यास १ हजार ५०० रूपय रोख, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच क्रमांक ४ पासून पुढील २२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रूपये व प्रमाणपत्र तसेच आश्रमशाळांतून प्रथम येणाºया विद्यार्थ्यास प्रोत्साहन म्हणून २०० रूपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला उत्स्फूूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली.