संजय तिपालेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते, याचाच प्रत्यय येथील भूमिपुत्र रजत सुनील वाळके यांनी दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वी रैंक पटकावत रजत यांनी आपल्या यशावर मोहोर उमटवली. ओडिशात 'सीआरपीएफ'मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा बजावत असतानाच, वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश खेचून आणले आहे.
रजत वाळके यांचे कुटुंब मूळचे चंद्रपूरचे, पण त्यांचे वडील सुनील वाळके हे जिल्हा परिषदेत वरिष्ठ लिपिक होते. नोकरीसाठी ते गडचिरोलीत आले अन् येथेच स्थायिक झाले. शहराच्या गोकुलनगरातील वॉर्ड क्र. १६ मधील गणेश कॉलनीत वाळके कुटुंबीय वास्तव्यास आहे. रजत यांचा हा संपूर्ण प्रवास संघर्षमय आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याचे वडील सुनील वाळके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ज्या दिवशी रजत यांची सीआरपीएफमध्ये निवड झाली, त्याच्या काही दिवसांतच ही दुर्दैवी घटना घडली. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी नागपूरहून वडिलांना भेटायला येत असतानाच वाटेत वडिलांच्या निधनाची बातमी आली. ती भेट अधुरीच राहिली, वडील गेल्याच्या दुःखातून सावरत त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, सुरुवातीपासून जिद्दी आणि अतिशय मेहनती असलेल्या रजत यांनी एवढ्यावरच न थांबता दुसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करून गडचिरोलीचा झेंडा रोवला.
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
घरात आई रत्नमाला या गृहिणी असून, मोठ्या बहिणी स्नेहा (वनविभाग) आणि शीतल (जीएसटी विभाग) यादेखील शासकीय सेवेत कार्यरत आहेत. रजत यांनी मिळवलेले हे यश ऐकताच कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माझ्या मुलाने त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले, अशी भावना व्यक्त करताना आईचा कंठ दाटून आला होता.
यशाचा 'रजत' मार्ग असा...
प्राथमिक शिक्षण : प्लॅटिनम ज्युबली स्कूल, गडचिरोली.माध्यमिक शिक्षण : शिवाजी हायस्कूल (विज्ञान शाखा).उच्च शिक्षण : व्हीएनआयटी (VNIT) नागपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी.पहिले यश : पहिल्याच प्रयत्नात 'सीआरपीएफ'मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड.दुसरे यश : नोकरी सांभाळत यूपीएससी क्रॅक करून ५१४ वी रैंक प्राप्त.
"असिस्टंट कमांडंट म्हणून देशसेवा करत असताना, अभ्यासाचे नियोजन करणे कठीण होते. मात्र, वडिलांची इच्छा आणि प्रशासकीय सेवेची ओढ यामुळे मी थांबलो नाही. हे यश माझ्या कुटुंबाच्या त्यागाचे फळ आहे."- रजत वाळके, यूपीएससी यशस्वी उमेदवार.
Web Summary : Rajat Walke, serving as Assistant Commandant in CRPF, cracked UPSC with 514th rank despite his father's death. Overcoming adversity, the Gadchiroli native balanced his duties with studies, fulfilling his father's dream. His family, including his mother and sisters, celebrate his success.
Web Summary : सीआरपीएफ में सहायक कमांडेंट रजत वाल्के ने पिता के निधन के बावजूद यूपीएससी में 514वीं रैंक हासिल की। विपरीत परिस्थितियों से उबरते हुए, गढ़चिरौली के मूल निवासी ने अपनी ड्यूटी और पढ़ाई को संतुलित किया, अपने पिता का सपना पूरा किया। उनके परिवार में उनकी मां और बहनें उनकी सफलता का जश्न मना रही हैं।