Gadchiroli: अमित शाह यांच्या दौऱ्याचा दुसरा मुहूर्तही हुकला, लवकरच नवीन तारीख निश्चित होईल: खासदार अशोक नेते यांची माहिती
By संजय तिपाले | Updated: December 6, 2023 12:50 IST2023-12-06T12:50:12+5:302023-12-06T12:50:56+5:30
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच कोनसरी येथील बहुचर्चीत स्टील प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते, त्यांच्या दौऱ्यासाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली होती, परंतु हा दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली.

Gadchiroli: अमित शाह यांच्या दौऱ्याचा दुसरा मुहूर्तही हुकला, लवकरच नवीन तारीख निश्चित होईल: खासदार अशोक नेते यांची माहिती
- संजय तिपाले
गडचिरोली - जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच कोनसरी येथील बहुचर्चीत स्टील प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते, त्यांच्या दौऱ्यासाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली होती, परंतु हा दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याचा नोव्हेंबरमधील मुहूर्तही हुकला होता.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या कोनसरी येथील स्टील निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन ९ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार होते. वडसा- गडचिरोली रेल्वेमार्ग तसेच इतर तीन रेल्वेमार्गाचे भूमिपूजन, चिचडोह प्रकल्पाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांचा यात समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देेवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यातच अमित शाह यांचा दौरा निश्चित होता, परंतु पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे हा दौरा पुढे ढकलला होता. त्यानंतर ९ डिसेंबरला मुहूर्त ठरला होता, परंतु काही कारणास्तव हा दौराही रद्द करण्यात आला आहे. स्वत: अमित शाह यांनी फोन करुन याबाबत माहिती दिली, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. त्यांचा गडचिरोली दौरा निश्चित असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे नेते म्हणाले.