गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:45 IST2025-08-06T12:43:58+5:302025-08-06T12:45:57+5:30

Gadchiroli : कंत्राटी प्राध्यापकांकडूनच भावी डॉक्टरांना धडे, अध्यापन कार्यात अडथळा

Gadchiroli Medical College cannot get professors; how will quality doctors be produced? | गडचिरोली मेडिकल कॉलेजला मिळेनात प्राध्यापक; कसे घडतील दर्जेदार डॉक्टर ?

Gadchiroli Medical College cannot get professors; how will quality doctors be produced?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
गेल्या वर्षीपासून गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग १ आणि २ ची तब्बल १५३ पदे रिक्त आहेत. येथे सर्व मिळून प्राध्यापकांची एकूण ८५ पदे मंजूर आहेत. मात्र, निम्म्याच प्राध्यापकांच्या भरवशावर या कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम सुरू आहे. येथे नियमित प्राध्यापकांची वानवा असून, कंत्राटी प्राध्यापकांकडून भावी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवेचे धडे दिले जात आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गतवर्षी महाराष्ट्र राज्यासाठी आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली. मात्र, पुरेसे प्राध्यापक नसल्याने त्या विषयांच्या अभ्यासाच्या बाबतीत या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. पण, या ठिकाणी पुस्तकी ज्ञानालाही मर्यादा आहेत.


आस्थापनात अपुरे कर्मचारी
सदर मेडिकल कॉलेजच्या आस्थापना विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सदर कॉलेजचे प्रशासकीय कामकाज अनेकदा प्रभावित होत असते. हे महाविद्यालयात सध्या बाल्यावस्थेत असून शासनाचे पाहिजे तसे गांभीर्याने लक्ष नसल्याचे दिसून येते.


४५ प्राध्यापक म्हणून काम करण्यास डॉक्टरांची ना
प्राध्यापकांची गडचिरोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कमतरता आहे. एकूण ८५ पदे मंजूर आहेत. पैकी ४० प्राध्यापक कार्यरत आहेत. यामध्ये कार्यरत नियमित प्राध्यापकांची जेमतेम १० एवढी असल्याचे सूत्रांनी सांगितले.


विद्यार्थी दुप्पट तरीही प्राध्यापक मिळेनात
नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालयात यंदा १०० विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. प्रथम वर्षाचे १०० व द्वितीय वर्षाचे १०० अशी २०० विद्यार्थिसंख्या होणार आहे.
ऑक्टोबर २०२५ पासून नवीन विद्यार्थी या कॉलेजमध्ये दाखल होणार आहेत. विद्यार्थी दुप्पट होत असले, तरीही प्राध्यापक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा गंभीर प्रश्न कायम आहे.


"प्राध्यापकांच्या रिक्त पदांची माहिती वरिष्ठांना सादर केली आहे. कॉलेजला ५० पेक्षा अधिक प्राध्यापकांची आवश्यकता असून, ती पदे भरण्यात यावी, याबाबत आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. कंत्राटी प्राध्यापकांसाठी दर आठवड्याला मुलाखती होतात."
- डॉ. अविनाश टेकाडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Gadchiroli Medical College cannot get professors; how will quality doctors be produced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.