गडचिरोलीतील भूसंपादनाला गती! मुख्यमंत्री फडणवीसांचा १५ दिवसांचा अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:22 IST2025-06-20T18:21:21+5:302025-06-20T18:22:24+5:30
गडचिरोली विमानतळाच्या ओएलएस सर्वेक्षणाचे आदेश : प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

Gadchiroli land acquisition accelerates! Chief Minister Fadnavis' 15-day ultimatum
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी १९ जून रोजी घेतला. यावेळी भंडारा- गडचिरोली द्रुतगती महामार्ग, रेल्वे तसेच विमानतळाचे भूसंपादन १५ दिवसांत पूर्ण करुन या प्रकल्पांना गती द्या, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे, भूसंपादनाची कामे गांभिर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
भंडारा- गडचिरोली द्रुतगती मार्गाची सद्यस्थिती अशी
भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग हा १५६ किमी लांबीचा आहे. पूर्व महाराष्ट्रातील महत्त्वाचा आणि प्रगत द्रुतगती मार्ग आहे, जो सध्या टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. पूर्ण झाल्यावर हा मार्ग भंडारा, गडचिरोली आणि नागपूरसारख्या शहरांना जलद आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा देईल. भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यासाठी शासनाकडून निधी देखील आलेला आहे.
विमानतळाच्या ओएलएस सर्वेक्षणाचे आदेश
गडचिरोली विमानतळाच्या धावपट्टीचा ओएलएस १ (अडथळा व मर्यादा) सर्वे करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वडसा - गडचिरोली रेल्वेमार्गाला गती द्यावी
वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यास गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. १५ दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले.