गडचिरोली: शेतकऱ्यांच्या जमिनीवर दलालांचा डोळा; आधी आमिष, नंतर परस्पर जमिनींची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:38 IST2025-08-26T19:37:42+5:302025-08-26T19:38:09+5:30
जोपर्यंत MIDC जमीन अधिग्रहणाचा आदेश देत नाही तोपर्यंत शेत जमीन मालकांनी परस्पर जमिनी विकून स्वतः ची फसगत करू नये : भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे आवाहन

Gadchiroli: Brokers eye farmers' land; first lure, then purchase of mutual lands
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, ईल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कड्डा देव आमगाव, घोट, आरमोरी, वडसा आदी भागात शेतजमिनीची परस्पर खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला असून आम्हाला तुम्ही जमीन विक्री करा आम्ही तुम्हाला योग्य मोबदला व नोकरी मिळवून देवु असे खोटे आश्वासन देवुन फसवणुक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही शेतकरी या आमिषाला बळी पडले असून जोपर्यंत MIDC उद्योगासाठी जमीन अधिग्रहणाचा आदेश पारित करीत नाही तो पर्यंत शेत जमीन मालकांनी खाजगी व्यक्तींना परस्पर जमिनी विक्री करून स्वतः ची फसवणुक करुन घेवू नये व जमीन खरेदी करणारे दलाल दिशाभूल करून शेतजमीन खरेदी साठी आल्यास माझ्याशी संपर्क करा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे.
उद्योगासाठी जमीन खरेदी करावयाची असल्यास MIDC जमीन अधिग्रहित करण्याचा आदेश पारित करते व विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शेत जमीन मालकांना मोबदल्याची हमी देवून व ज्या उद्योगासाठी जमीन अधिग्रहित होणार आहे त्या उद्योग प्रकल्पात नोकरीची हमी देवूनच जमीन खरेदी विक्रीची प्रक्रिया पार पाडली जाते. मात्र जिल्हयाच्या विविध भागात अशी परस्पर जमीन खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाल्याने अनेक शेतजमीन मालकांची फसवणुक झाली असून जमीन मालकांनी अशी परस्पर खरेदी विक्री ची प्रक्रिया पार पाडून स्वतच्या पायावर दगड मारून घेवू नये अशी कळकळीची विनंती माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केली आहे.
MIDC मार्फत जमीन खरेदी -विक्री ची प्रक्रिया पार न पाडता खाजगी व्यक्तीला जमीन विक्री केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होवू शकतात याचे आष्टी पेपरमील हे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. इल्लुर येथील शेतकऱ्यांनी परस्पर खाजगी व्यक्तिला उद्योगासाठी आपली जमीन विकली. मात्र पेपर मील उद्योग प्रकल्प बंद अवस्थेत आहे यात नोकरीही गेली आणि जमीन खाजगी व्यक्तीच्या मालकीची झाली त्यामुळे शेतजमीन मालकावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही जमीन मालकांनी जोपर्यंत MIDC जमीन अधिग्रहित करत नाही तोपर्यंत शेतजमीन खरेदी विक्रीचा व्यवहार पार पाडू नये कारण यात जमीन मालकांची शुद्ध फसवणूक होणार आहे व या जमिनीवर कोणताही उद्योग प्रकल्प आल्यास त्यात नोकरीची कोणतीही हमी असणार नाही त्यामुळे शेतजमीन मालकांनी स्वतः ची फसवणुक करून घेवू नये व खोटी दिशाभूल करून व विविध आमिष दाखवून जर तुम्हाला जमीन विक्री करण्यास कुणी बांधील करीत असेल तर माझ्याशी संपर्क साधा किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या व या दलालांचे पितळ उघडे पाडा असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे.