खराब रस्त्याने घेतला गर्भवती महिलेचा जीव; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 13:35 IST2022-09-15T13:31:43+5:302022-09-15T13:35:58+5:30

दामरंचावरून चिटवेलीला जाण्यासाठी रस्ताच नाही

gadchiroli : Bad road killed tribal pregnant woman | खराब रस्त्याने घेतला गर्भवती महिलेचा जीव; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

खराब रस्त्याने घेतला गर्भवती महिलेचा जीव; प्रसूतीसाठी नेताना वाटेतच मृत्यू

कमलापूर (गडचिरोली) : परिसरातील दामरंचावरून चिटवेलीला जाण्यासाठी रस्ताच नाही. खराब व कच्च्या रस्त्याने चिटवेली गावातील गर्भवती महिलेचा बळी गेला. मंगळवारला वाटेतच आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. झुरी दिलीप तलांडी (वय २६) असे या महिलेचे नाव आहे.

अहेरी तालुक्यातील दामरंचा गावापासून १० किमी अंतरावर अतिदुर्गम भागात चिटवेली गाव वसलेले आहे. येथे १०० टक्के आदिवासी कुटुंब राहतात. मात्र स्वातंत्र्याला ७५ होऊनही या गावाला जाण्यासाठी मुख्य मार्ग नाही. जंगलातून पायवाटेने प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा शासन, प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मंगळवारी चिटवेली येथील झुरी दिलीप तलांडी नामक गर्भवती महिलेला त्रास होऊ लागला. तिला ट्रॅक्टरमधून दामरंचाकडे आणत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. आजपर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. दरवेळी निवडणूक आली की लोकप्रतिनिधी येऊन मोठमोठी आश्वासने देतात, मात्र रस्त्याच्या समस्याचे निराकरण करण्याकडे दुर्लक्ष करतात. प्रशासने लक्ष देऊन रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दामरंचा ग्रामपंचायतच्या सरपंच किरण कोडापे, ग्रामपंचायत सदस्य सम्मा कुरसाम, प्रमोद कोडापे यांनी केली आहे.

Web Title: gadchiroli : Bad road killed tribal pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.