गडचिरोली व देसाईगंजचा पाणी पुरवठा ठप्प
By Admin | Updated: July 24, 2014 23:51 IST2014-07-24T23:51:41+5:302014-07-24T23:51:41+5:30
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वैनगंगेसह तिच्या उपनद्या असलेल्या गाढवी, कठाणी यांच्या जलस्तर उंचावलेला आहे.

गडचिरोली व देसाईगंजचा पाणी पुरवठा ठप्प
गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वैनगंगेसह तिच्या उपनद्या असलेल्या गाढवी, कठाणी यांच्या जलस्तर उंचावलेला आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे फिल्टर प्लँट पाण्याखाली आले आहे. यामुळे गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे. तर देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातही नळ पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. कठाणी नदीला पूर आल्याने गडचिरोली-नागपूर मार्गावरची वाहतूकीही बुधवारपासून बंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना खरपुंडी मार्गावरून जावे लागत आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना वैनगंगा नदीवरच अवलंबून आहे. वैनगंगेला प्रचंड पूर असल्याने या सर्व गावांमध्ये दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गडचिरोली शहरातील नगर पालिकेचा फिल्टर प्लँट हा वैनगंगा नदीच्या काठावर आहे. या भागात नाल्यालाही पूर आला असल्यामुळे पालिकेची यंत्रणा येथे पोहोचू शकत नाही. त्यामुळे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची पाण्यासाठी बोअरवेलवर गर्दी झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)