गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 17:07 IST2018-02-07T17:04:35+5:302018-02-07T17:07:34+5:30
आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करा : नीलम गोऱ्हे
गडचिरोली : गडचिरोलीच्या ता.धानोरा येथील मोहर्ली गावात चक्क एका मटणाच्या पार्टीसाठी बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आरोपीला मटणाची पार्टी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. या घटनेची शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली असून आज दि. ०७ फेब्रुवारी, २०१८ रोजी गडचिरोली पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क साधला आणि घटनेची माहिती घेतली.
१७ जानेवारी २०१८ ला पाचवीतील चिमुरडीवर बलात्कार झाला होता. यात २४ जानेवारीला गुन्हा दाखल करून आरोपीला आणि सहा जातपंचायतीच्या पंचांना पोलिसांनी अटक केली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. आरोपींवर पॉस्को आणि जातपंचायत कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.
आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अल्पवयीन मुलीचे समुपदेशन करण्यासंदर्भात सूचना दिल्या.