तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला
By Admin | Updated: August 9, 2014 01:09 IST2014-08-09T01:09:44+5:302014-08-09T01:09:44+5:30
भामरागड तालुक्यातील विविध प्रलंबित समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भामरागड तालुका विकास कृती समितीच्यावतीने ...

तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला
भामरागड : भामरागड तालुक्यातील विविध प्रलंबित समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भामरागड तालुका विकास कृती समितीच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर हजारो नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला आहे.
सदर मोर्चा तालुका कृती समितीचे अध्यक्ष अॅड. लालसू नरोटे, सचिव मोहन कुळमेथे यांच्या नेतृत्वात येथील पर्लकोटा नदीवरून दुपारी १२ वाजता मुख्य चौकातून तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर तालुका विकास कृती समितीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार केलवराम वाढई यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करू नये, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडीसा या मध्य भारतातील बोलल्या जाणाऱ्या गोंडी भाषेला भारतीय राज्य घटनेतील ८ व्या अनुसूचित समाविष्ट करावे, विदर्भ राज्य घोषीत करून अहेरी जिल्हा निर्माण करावा, शासकीय, निमशासकीय नोकरीत स्थानिक सुशिक्षीत बरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे, भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात यावे, भामरागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये नियमित औषधसाठा उपलब्ध करावा, भामरागड तालुक्यातील सर्व गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, तालुक्यातील लाहेरी, धोडराज, कोठी, ताडगाव, मन्नेराजाराम आदी गावात बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा पुरविण्यात यावी, हेमलकसा येथील टॉवरची क्षमता वाढविण्यात यावी, पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, तालुक्यातील अवैध देशी, विदेशी दारूविक्री आढा घालावा, भामरागड-नागपूर बसफेरी सुरू करण्यात यावी, तालुक्यातील मंजूर करण्यात आलेले फौजदारी न्यायालय तत्काळ सुरू करण्यात यावे, भामरागड येथे मिनी बसडेपोला मंजूर देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदार केवलराम वाढई यांनी समस्यासंदर्भात तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येईल. समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या आंदोलनात विजय कुडयामी, विश्वनाथ आत्राम, लक्ष्मीकांत लगामी, सुधाकर तिम्मा आदीसह भामरागड तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)