छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

By दिगांबर जवादे | Updated: May 23, 2025 19:17 IST2025-05-23T19:17:13+5:302025-05-23T19:17:37+5:30

घटनास्थळावरून काही हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

Four Maoists killed on Chhattisgarh border, Gadchiroli police action, spent the night in the forest | छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

दिगांबर जवादे/गडचिराेली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील भामगराड तालुक्यातील कवंडे जंगल परिसरात माओवादी व पाेलिस यांच्यात शुक्रवारी सकाळी चकमक उडाली. यात चार माओवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून काही हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

नव्याने स्थापन केलेल्या पोलिस स्टेशन कवंडे हद्दीत काही माओवादी दबा धरून बसले असल्याच्या माहितीच्या आधारे ३०० सी-६० कमांडाे आणि सीआरपीएफची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात रवाना करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी सदर परिसरामध्ये घेराबंदी करून शोध मोहीम राबवत असताना माओवाद्यांनी सी-६० जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्याला पोलिस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास गोळीबार सुरू होता. यानंतर पोलिस पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली असता चार जहाल माओवाद्यांचे मृतदेह, एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल, दोन ३०३ रायफल आणि एक भरमार बंदूक मिळून आली. याशिवाय, घटनास्थळावरून वॉकीटॉकी, छावणी साहित्य, नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

भर पावसात निघाले अभियानावर
इंद्रावती नदी महाराष्ट्र व छत्तीगसड राज्याची दुभाजक आहे. याच नदीच्या परिसरात माओवादी लपून बसले असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना प्राप्त झाली. पाेलिसांचे पथक ज्यावेळी रवाना झाले त्यावेळी भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस काेसळत हाेता. रात्रभर जंगलात थांबून शुक्रवारी सकाळी शाेधमाेहीम सुरू करण्यात आली.

Web Title: Four Maoists killed on Chhattisgarh border, Gadchiroli police action, spent the night in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.