एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव; मरणाच्या दारातही दोस्तीचा हात कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 15:04 IST2023-05-15T15:04:03+5:302023-05-15T15:04:22+5:30
१४ मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली.

एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव; मरणाच्या दारातही दोस्तीचा हात कायम
चामोर्शी (जि. गडचिरोली) : हॉटेलात जेवण करून पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले, यावेळी खोल पाण्यात एक मित्र बुडत असल्याचे पाहून चौघे धावले. बुडत असलेल्या मित्राला वाचवले; पण नंतर ते चौघेही बुडाले. १४ मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली.
प्रफुल्ल विठ्ठल येलुरे (२०), महेश मधुकर घोंगडे (२०), शुभम रूपचंद लांजेवार (२४, तिघेही रा. प्रभाग क्र. ४ आशा सदन टोली, चामोर्शी), मोनू त्रिलोक शर्मा (२६, रा. गडचिरोली) अशी मयतांची नावे आहेत. हर्षल धोडरे (२२, रा. चामोर्शी) हा बालंबाल बचावला.
रविवारी ते दुपारी एकत्रित आले. चामोर्शीजवळील एका हॉटेलात त्यांनी जेवण केले. त्यानंतर चिचडोह बंधाऱ्यात पाेहण्याचे ठरवले. पाचही जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी चौघेही धावले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बोट तसेच डोगा उपलब्ध नसल्याने दोरी बांधून पाण्यात उडी घेतली; पण कोणालाही वाचविण्यात यश आले नाही.