शौचालयाच्या वापरानुसार लागणार चार रंगाचे स्टिकर
By Admin | Updated: December 18, 2015 01:42 IST2015-12-18T01:42:51+5:302015-12-18T01:42:51+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांकडे शौचालय आहे काय, असेल तर ते त्याचा वापर करतात किंवा नाही, या सर्व बाबी प्रशासनाच्या लक्षात याव्या यासाठी ....

शौचालयाच्या वापरानुसार लागणार चार रंगाचे स्टिकर
जिल्हा परिषदेचा उपक्रम : ५२ गावांना विशेष प्राधान्य
गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांकडे शौचालय आहे काय, असेल तर ते त्याचा वापर करतात किंवा नाही, या सर्व बाबी प्रशासनाच्या लक्षात याव्या यासाठी शौचालयांच्या वापरानुसार वेगवेगळ्या रंगाचे चार स्टिकर प्रत्येक शौचालयावर लावण्यात येणार आहेत. २०१५-१६ मध्ये निवड केलेल्या ५२ गावांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत हागणदारीमुक्त गावे करण्यासाठी शासन ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाला १२ हजार रूपये देऊन शौचालय बांधून देत आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शौचालयाच्या वापराविषयी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. परिणामी शौचालयाचा वापर इतर कारणांसाठीच केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजपर्यंत शासनाने केलेले कोट्यवधी रूपये पाण्यात गेले, अशीही टीका होत आहे.
ज्या कुटुंबाला शासनाने शौचालय बांधून दिले आहे. ते कुटुंब शौचालयाचा वापर करते किंवा नाही, याचा आढावा चार रंगाच्या स्टिकरच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. ज्या कुटुंबातील सर्वच सदस्य शौचालयाचा वापर करतात व त्यांच्या शौचालयाचे बांधकाम चांगल्या स्थितीत आहे, अशा कुटुंबाच्या शौचालयावर ‘लय भारी’ असा संदेश देणारा हिरव्या रंगाचा स्टिकर लावण्यात येणार आहे. शौचालय असूनही काही सदस्य शौचासाठी बाहेर जातात व काही सदस्य शौचालयाचा वापर करतात. अशा कुटुंबाच्या शौचालयावर पिवळ्या रंगाचा ‘फिप्टी-फिप्टी’ असा संदेश दर्शविणारा स्टिकर लावण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, त्याचबरोबर त्यांच्याकडे शौचालय असूनही त्या कुटुंबातील एकही सदस्य शौचालयाचा वापर करीत नाही. त्यांच्या घराच्या भिंतीवर खतरा/धोका असे लाल रंगाचे स्टिकर चिपकविले जाणार आहे.
शौचालय नादुरूस्त असेल, मोडकळीस आलेले असेल व वापरास अयोग्य असल्यास त्या शौचालयावर केशरी रंगाचा ‘जरा जपून’ हा संदेश दर्शविणारा स्टिकर चिपकविला जाणार आहे. जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे स्टिकर मागिले असून आठ दिवसांत सदर स्टिकर प्राप्त होणार आहेत. स्टिकर प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावरील पाणी व स्वच्छता विभागात काम करणाऱ्यांकडून सर्वे करून सदर स्टिकर प्रत्येक कुटुंबाच्या शौचालयावर चिपकविले जाणार आहेत. (नगर प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणी लावणार फलक
शौचालयाचे बांधकाम करून त्याच्या वापराबाबत नागरिकांना प्रेरणा मिळावी, यासाठी प्रत्येक कुटुंबाची शौचालय वापराबाबतची स्थिती दर्शविणारा फलक सार्वजनिक ठिकाणी लावला जाणार आहे. १५ ते २० दिवसानंतर आणखी संबंधित घरांचा सर्वे करून या सर्वेदरम्यान जी स्थिती समोर येईल, त्यानुसार संबंधित फलकामध्ये बदल केला जाणार आहे. सर्वे करताना लाल व पिवळ्या रंगाचे स्टिकर प्राप्त झालेल्या कुटुंबांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी फलक लावल्यामुळे याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊन शौचालयाचा वापर वाढेल.