लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : माझे अनेक डीपफेक (खोटे) व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून, लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी सायबर संरक्षण अधिक मजबूत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केले.
‘ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, तंत्रज्ञान, साधनांचा वापर फसवणुकीसाठी आणि दिशाभूल करण्यासाठी केला जाऊ शकतो. माझेच अनेक डीपफेक व्हिडीओ बनवून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.
गुन्हेगार डेटा नव्हे, तर विश्वास हॅक करत आहेत
सीतारामन म्हणाल्या की, आजचे गुन्हेगार एआय वापरून आवाज, ओळख आणि चेहरा बनावट तयार करतात. म्हणजेच ते आता डेटा नव्हे, तर विश्वास हॅक करत आहेत. यावर फिनटेक कंपन्या, गुंतवणूकदार आणि नियामक संस्था असे सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. तसेच, प्रणाली सुरक्षित, सर्वसमावेशक, टिकाऊ असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
