दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील धान पुंजणे जळून खाक; विराेधकांनी आग लावल्याची शंका
By गेापाल लाजुरकर | Updated: December 11, 2024 15:20 IST2024-12-11T15:18:43+5:302024-12-11T15:20:05+5:30
कुकडेल येथील घटना : पहाटेच्या सुमारास साधला डाव

Four acres of rice paddy belonging to two farmers got burnt
गडचिराेली : धान मळणीसाठी शेतात तयार करून ठेवलेल्या दाेन शेतकऱ्यांच्या शेतातील पुंजण्याला अचानक आग लागल्याने धान पुंजणे जळून खाक झाले. ही घटना काेरची तालुक्यातील कुकडेल येथे बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री २ वाजेचा सुमारास घडली. या घटनेत दोन शेतकऱ्यांचे चार एकरातील १ हजार २५० भाऱ्याचे पुंजणे जळाले.
कोरची तालुका मुख्यालयापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुकडेल येथील शेतकरी देवसाय नुरुटी यांनी गावालगतच्या टाहकाटोला रस्त्याजवळच्या दीड एकर शेतात हायब्रेड जातीच्या जाड धानाचे पुंजणे दोन आठवड्यांपूर्वी तयार केले हाेते. या पुंजण्यात ५०० भारे हाेते. तर याच गावातील दुसरे शेतकरी मन्साराम हलामी यांनी गावालगतच्या अडीच एकर शेतात ‘अ’ दर्जाचे बारीक धानाच्या ७५० भाऱ्यांचे पुंजणे शेतात तयार करून ठेवले होते. येत्या दाेन-तीन दिवसांत ते मळणी करणार हाेते; परंतु बुधवारी रात्री २ वाजताच्या सुमारास दाेन्ही शेतकऱ्यांच्या धान पुंजण्याला आग लागली. यात एकूण चार एकरातील संपूर्ण धानाचे पुंजणे जळून खाक झाले. देवसाय नुरुटी यांचे अंदाजे ७५ हजार रुपयांचे तर मन्साराम हलामी यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. पुंजण्यांना काेणीतरी विराेधकांनी जाणूनबुजून आग लावली असावी, अशी शंका व्यक्त करीत पुंजणे जाळणाऱ्यांचा शाेध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी दाेन्ही शेतकऱ्यांनी केली.
आग शमविण्याचा प्रयत्न विफल
शेतात पहाटेच्या सुमारास धान पुंजण्यांना आग लागल्याचे शेतकरी संतराम काटेंगे व गणेश नुरूटी यांना दिसले. त्यांनी वेळीची गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शेतातील विहिरीच्या पाण्याने आग शमविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे दाेन्ही शेतकऱ्यांचे धान पुंजणे जळून खाक झाले. याबाबत माहिती मिळताच टेमलीचे तलाठी महेश निकुरे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.