तेलंगणात अडकलेल्या मजुरांचा सरकारला विसर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:58 IST2020-04-28T18:57:27+5:302020-04-28T18:58:53+5:30
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.

तेलंगणात अडकलेल्या मजुरांचा सरकारला विसर?
दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमुळे कामाच्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. वास्तविकत: पूर्व विदर्भातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहेत. या चार जिल्ह्यांव्यतिरिक्त भंडारा, गोंदिया, लातूर या जिल्ह्यांमधील हजारो मजूर विविध कामांसाठी तेलंगणा राज्यात कामासाठी जातात. सरकारी आकडेवारीनुसार, एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १३ हजार १७७ मजूर तेलंगणा राज्यात अडकले आहेत. तसेच तेलंगणा राज्यातीलही शेकडो मजूर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. तेलंगणा राज्यात मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मिरची तोडण्यासाठी जानेवारी महिन्यात गेले होते. घराकडे परतण्याच्या तयारीत असताना कोरोनामुळे केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे महिनाभरापासून सदर मजूर कामाच्या ठिकाणी अडकले आहेत. ते घराकडे येण्याची आस लावून आहेत. पण राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने त्यांना परत येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे राज्य शासनानेच त्यांना आणण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
दोन राज्यातील मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्याला वगळण्यात आले आहे. राज्य शासनाने ही चूक तातडीने सुधारून तेलंगणातील मजुरांचा स्वगावी येण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. सध्या अनेक मजूर आडमार्गाने, पोलिसांची नजर चुकवत, शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.