Fly on the highway | महामार्गावर उडतो धुराळा
महामार्गावर उडतो धुराळा

ठळक मुद्देमुरूम टाकून बुजविल्या गॅप : दुसऱ्या बाजुच्या कामाला होणार सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात तयार होत असलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यावर काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे. मोठे वाहन जाताच धुळीचे कण मागे असलेल्या वाहनधारकावर उडत आहेत. या धुळीमुळे मार्गाच्या बाजूचे दुकानदार व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
मागील एक वर्षापासून गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करायचे आहे, तसेच जोडरस्ता येणार आहे, अशा ठिकाणी गॅप ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याशिवाय गॅपच्या ठिकाणी योग्य ते पूल किंवा इतर बांधकाम करणे शक्य नाही. त्यामुळे या गॅप जोपर्यंत दुसऱ्या बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार नाही, तोपर्यंत कायम राहणार आहे. शहरातील लांझेडा वॉर्ड ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. आता दुसºया बाजूला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी ज्या बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्या बाजूने वाहतूक वळविली जाणार आहे. यासाठी गॅपमध्ये मुरूम टाकण्यात आले आहे. शहरातील मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. या मुरूमाच्या जागेवरून एखादे मोठे वाहन गेल्यानंतर धूळ उडते. या धुळीमुळे नागरिक, वाहनधारक व जवळचे दुकानदार कमालीचे त्रस्त आहेत. धूळ प्रचंड प्रमाणात राहत असल्याने वाहनधारक व जवळच्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटते. दिवसभर धूळ उडत राहत असल्याने दुकानदार व रस्त्याच्या बाजूला ज्यांची घरी आहेत ते कुटुंब त्रस्त होणार आहेत. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होणार आहे.
धूळ उडू नये यासाठी कंत्राटदारामार्फत पाणी टाकले जात आहे. मात्र सदर पाणी अपुरे आहे. विशेष म्हणजे टाकलेले पाणी १० मिनीटातच सुकून जाते. त्यामुळे पुन्हा धूळ उडण्यास सुरूवात होते. गडचिरोलीकरांना धुळीचा सामना दुसरी पूर्ण होईपर्यंत करावा लागणार आहे. सध्या ऊन कमी आहे. त्यामुळे टाकलेले पाणी काही काळ टिकते. मात्र उन्हाळ्यात पाणी लवकरच सुकेल. त्यामुळे उन्हाळ्यात धुळीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरी बाजू पूर्ण झाल्यानंतरच गॅप बुजविली जाणार
ज्या ठिकाणी गॅप ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी पूल बांधले जाणार आहे किंवा दुसºया बाजूचा रस्ता जोडणार आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन्ही बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यानंतच पुलाचे बांधकाम तसेच जोड रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ज्या गॅप आज आहेत, त्या गॅप दोन्ही बाजुचा रस्ता तयार होईपर्यंत कायम राहणार आहेत. तोपर्यंत शहरावासीयांना धुळीचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरातील बांधकाम लवकरात लवकर होईल, याकडे कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.


Web Title: Fly on the highway
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.