पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 07:15 PM2020-09-25T19:15:03+5:302020-09-25T19:17:33+5:30

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली.

Floods affect over 20,000 hectares in Gadchiroli | पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

Next
ठळक मुद्दे २३ कोटींची मदत आवश्यकगोसेखुर्द धरणाच्या पाण्याने धान व इतर पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. पंचनाम्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण २० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी २३ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे.
संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या सहा तालुक्याला बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्यूमुखी पडले. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या या महापुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख १० मार्ग चार दिवस बंद होते. परिणामी वाहतूक ठप्प पडली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना या पुराचा फटका बसला.
प्रशासनाच्या पंचनामा अहवालानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झालेले एकूण बाधित क्षेत्र २० हजार २३१ इतके आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६०६४.८६ हेक्टर क्षेत्र, चामोर्शी ४०६१.०८, मुलचेरा २७.८५, देसाईगंज २४८६.६७, आरमोरी ४८४९.०४, अहेरी १०५५.१७ व सिरोंचा तालुक्यात १६८६.५८ इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोरडवाहू व आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या या नुकसानीपोटी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये नुसार एकूण २२ हजार ६४८ शेतकऱ्यांना एकूण २३ कोटी ७१ लाख ३३ हजार ८२६ इतके अनुदान मदतीसाठी लागणार आहे. याशिवाय बहुवार्षिक पिकांचेही गोसेखुर्द पाण्याने नुकसान झाले आहे.

२ हजार ११३ कोंबड्यांचा बळी
गोसेखुर्द धरणाच्या पाणी सोडून महापूर आल्याने चार दिवसात गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यातील एकूण २ हजार ११३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरा १ हजार २४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे. याशिवाय पुराच्या पाण्यात सापडून सहा दुधाळ जनावरे दगावली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील एक, देसाईगंज चार व आरमोरी तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे. या नुकसानीपोटी शासनाकडून लाखो रूपयांचे अनुदान लागणार आहे.

Web Title: Floods affect over 20,000 hectares in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर