‘पर्लकोटा'ला पूर, भामरागडसह १०० गावांचा तुटला संपर्क, पुलावरून वाहतेय पाणी: छत्तीसगडमधील अतिवृष्टीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:00 IST2025-09-26T09:59:55+5:302025-09-26T10:00:23+5:30
गुरुवारी सकाळपासूनच भामरागड व छत्तीसगड राज्यात संततधार पावसाचा जोर कायम होता. डोंगराळ भागातून आलेल्या पाण्याचा जोर वाढल्याने पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले.

‘पर्लकोटा'ला पूर, भामरागडसह १०० गावांचा तुटला संपर्क, पुलावरून वाहतेय पाणी: छत्तीसगडमधील अतिवृष्टीचा फटका
गडचिरोली : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भामरागड तालुका मुख्यालयासह शंभरवर गावांचा पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे. छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पर्लकोटा नदीला मोठा पूर आला, त्यामुळे भामरागडला फटका बसला.
गुरुवारी सकाळपासूनच भामरागड व छत्तीसगड राज्यात संततधार पावसाचा जोर कायम होता. डोंगराळ भागातून आलेल्या पाण्याचा जोर वाढल्याने पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. परिणामी आल्लापल्ली–भामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त तैनात केला आहे.
एसटी बस व खासगी वाहने अडकली
वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.
पाऊस थांबला; तरीही धास्ती कायम
सध्या पावसाची तीव्रता कमी झाली असून दुपारपर्यंत पुलावरील पाणी ओसरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व पर्यायी रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.