जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:10 IST2019-03-25T00:10:32+5:302019-03-25T00:10:58+5:30
ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत.

जैैविक खतांवर फुलविल्या फळभाज्या
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत. परंतु एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बुर्गी येथील बचत गटाने अनोख्या पद्धतीने फळभाजीपाला लागवड व्यवसाय सुरू केला. रासायनिक खतांचा वापर न करता महिलांनी जैविक खतांचा वापर करून फळभाज्यांची बाग फुलविली. यातून त्यांना दरमहा ८ ते १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
तालुक्यातील बहुतांश गावे ही नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल आहेत. शहरी भागाच्या तुलनेत हा भाग आजही विकासापासून दूर आहे. महिलांना रोजगार मिळत नाही. अशा स्थितीत बुर्गीच्या लक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी रोजगार निर्मिती व आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी एक पाऊल पुढे टाकले. सुरूवातीला गावातील १० महिलांनी एकत्र येऊन लक्ष्मी बचत गटाची स्थापना केली.
बचत गटाची स्थापना तर झाली, मात्र रोजगारासाठी बचत गटाकडे काहीच मार्ग नव्हता. बुर्गीचे उपसरपंच रामा तलांडे यांनी बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देत त्यांना आपल्या मालकीची जमीन कसण्यासाठी दिली. त्यानंतर महिलांनी माविमच्या माध्यमातून बँकेद्वारा बचत गटास ६० हजाराचे कर्ज मिळविले. या पैशातून महिलांनी मल्चिंग पेपर, पाण्यासाठी पंप मशीन घेतली. जमिनीच्या मशागतीसाठी व इतर बाबींसाठी उपसरपंच रामा तलांडे यांनी मदत केली. या सर्व परिश्रमानंतर फळभाजीपाल्याची बाग महिलांनी तयार केली.
भाजीपाला वाढीसाठी रासायनिक खतांचा करताना आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम जाणून बागेतील रोपांच्या वाढीसाठी महिलांनी रासायनिक खतांचा वापर टाळत जैविक खतांचा वापर केला. या खतांच्या माध्यमातून फळभाज्यांची जोमाने वाढ झाली. सध्या या बागेतील भाजीपाला व फळभाज्या निघण्यास सुरूवात झाली आहे. या बागेतून निघालेला भाजीपाला व फळभाज्या महिला बुर्गीच्या आठवडी बाजारात दर बुधवारी विक्रीसाठी ठेवतात. सध्या महिलांना महिन्याकाठी ८ ते १० हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
जिल्ह्यात भरपूर महिला बचत गट आहेत. मात्र परिश्रम करून फळभाज्यांची बाग फुलवित आर्थिक भरभराटीकडे वाटचाल करणारा बुर्गीचा लक्ष्मी महिला बचत गट जिल्ह्यातील इतर बचत गटांच्या महिलांसाठी आदर्श ठरत आहे.
कामाचे योग्य नियोजन व लेखाजोखा
फळभाज्यांच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून महिलांनी काही महिन्यांतच ४२ हजारांचे कर्जसुद्धा फेडले. बागेची योग्य निगा राखली जावी यासाठी बचत गटाच्या दोन महिला आळीपाळीने दररोज बागेत काम करीत असतात. दर रविवारी सदस्यांची बैठक घेतली जाते या बैठकीत हिशेब व लेखाजोखा मांडला जातो. बचत गटातील महिलांच्या आर्थिक उन्नतीत आणखी भर पडावी यासाठी मिनी राईस मिल योजनेच्या माध्यमातून प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे, असा मानस उपसरपंच रामा तलांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.