अहेरी उपविभागातील समस्या सोडवा
By Admin | Updated: July 16, 2016 01:46 IST2016-07-16T01:46:54+5:302016-07-16T01:46:54+5:30
७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

अहेरी उपविभागातील समस्या सोडवा
अहेरी उपविभागातील समस्या सोडवारस्ते, वीज दुरूस्त करा : धर्मराव आत्राम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
गडचिरोली : ७ ते १३ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी उपविभागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शिवाय बऱ्याच गावांचा वीज पुरवठा अद्यापही बंद आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा अहेरी उपविभागाला प्रचंड फटका बसला. रस्ते व वीज पुरवठा दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा राकाँचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, संततधार व मुसळधार पावसामुळे अहेरी उपविभागात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली. शिवाय वीज पुरवठाही बंद झाला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अहेरी उपविभागातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही आत्राम यांनी म्हटले आहे. दरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याशी अहेरी उपविभागातील विविध समस्या संदर्भात सखोल चर्चा केली.
या आहेत मागण्या
आष्टी- आलापल्ली, आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- मुलचेरा, आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरूस्ती करावी, भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे काम सुरू करावे, लहान रपट्याऐवजी मोठे पूल बांधावे, सिरोंचा- आलापल्ली वाहिनीवरील वीज पुरवठ्याच्या देखभालीचे महावितरणला निर्देश द्यावे, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील गावांचा वीज पुरवठा सुरू करावा, नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करावे, येर्रावागू नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने येथे पर्यायी रस्ता तयार करावा.