रेती चोरी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:40+5:30
रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते.

रेती चोरी करणारे पाच ट्रॅक्टर जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कठाणी नदीच्या बोदली रेती घाटातून रेतीची तस्करी करणारे पाच ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता जप्त केले.
बोदली रेती घाटातून मागील दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक केली जात होती. सदर रेती गडचिरोली शहरात आणून चार हजार रूपये प्रती ब्रॉस दराने विकली जात होती. याबाबत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी वाढल्या होत्या.
रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी यापूर्वी केवळ मंडळ कार्यालयापुरतेच पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला त्यांच्याच क्षेत्रात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या मंडळात जाऊन कारवाई करणे अशक्य होत होते.
यावर उपाय म्हणून तालुकास्तरावरील पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाला संपूर्ण गडचिरोली तालुक्यात कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
या पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता बोदली घाटावर धाड टाकली. यामध्ये सुमारे ९ ट्रॅक्टर रेती भरताना आढळून आले. त्यापैकी चार ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले. पाच ट्रॅक्टर जप्त करून ते तहसील कार्यालय गडचिरोली येथे जमा करण्यात आले आहेत. सदर ट्रॅक्टर श्यामराव गणपत भुरले, सुशील दिवाकर कोठारे, सुशांत सदाशिव आंबोरकर, रमेश सुकमाजी भांडेकर व पंकज नैताम यांच्या मालकीचे आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या तयार केलेल्या पथकाला संपूर्ण तालुक्यात कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच स्वतंत्र वाहनही उपलब्ध करून दिले आहे. हे पथक आता संपूर्ण तालुका पिंजून काढणार आहे. त्यामुळे आणखी कारवाया वाढण्याची शक्यता आहे.