For the first time in this Naxalite area, the jaighosh of Bharatmata was heard | Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष

Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष

ठळक मुद्दे सर्वांचे तोंड गोड केल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलले. सर्वांनी 'भारत माता की जय'चे नारे लावत लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला.

श्यामराव येरकलवार


लाहेरी (गडचिरोली) : एकीकडे 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीच्या दुर्गम भागात मात्र राष्ट्रीय सण कोणते आणि ते कशासाठी साजरे केले जातात याचा लवलेशही नसतो. पण यावेळी अनेक भागात पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातही प्रजासत्ताक दिन साजरा झाला. या दिवसाचे महत्व बालगोपालांसह गावकऱ्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही तर त्यांचे तोंडही गोड करण्यात आले.
गडचिरोली या जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील लाहेरी, मुरंगलसारखा परिसर नेहमीच नक्षल दहशतीत वावरणारा आहे. त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. परिणामी राष्ट्रीय सणही साजरे होत नाही. पण यावेळी त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.


नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलीस ठाणे लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर हे आपल्या पोलीस पथकासह मुरंगल येथे आले व त्यांनी गावकऱ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगत उपस्थित गावकरी, बालकांना मिठाई वाटप केली. सर्वांचे तोंड गोड केल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलले. सर्वांनी 'भारत माता की जय'चे नारे लावत लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला.


पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या या संवेदनशील उपक्रमाने आदिवासी बांधव भारावून गेले. यावेळी सीआरपीएफ 37 बटालियनचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले पीएसआय अजयकुमार राठोड, विजय सपकाळ, हवालदार अरुण टेकाम, नायक यशवंत दाणी, फिरोज गाठले, शिपाई मोहित मानकर, पुरुषोत्तम कुमरे, मालू पुंगाटी, चिरंजीव दुर्गे, सौरव बाळबुध्ये, हमीत डोंगरे, अमित कुलेटी, संदीप आत्राम व सीआरपीएफचे जवान आदी उपस्थित होते.

Web Title: For the first time in this Naxalite area, the jaighosh of Bharatmata was heard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.