अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निशमनचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:47+5:302021-03-04T05:09:47+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : दरवर्षी उन्हाळ्यात व हिवाळ्यात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना घडून लाखाे ...

Firefighters rely on untrained personnel | अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निशमनचा कारभार

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निशमनचा कारभार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : दरवर्षी उन्हाळ्यात व हिवाळ्यात जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना घडून लाखाे रुपयांचे नुकसान हाेते. आगीच्या या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे याकरिता शासनाच्या वतीने नगर परिषद व काही नगर पंचायतस्तरावर अग्निशमन दलाची सुविधा दिली आहे. मात्र, ही सुविधा अतिशय ताेकडी आहे. गडचिराेली, देसाईगंज, अहेरी व सिराेंचा या केवळ चार तालुक्यांत ही सुविधा आहे; पण या ठिकाणीही अप्रशिक्षित आणि रोजंदारी कर्मचारी अग्निशमन व्यवस्था सांभाळत आहेत.

गडचिराेली नगर परिषद प्रशासनाकडे अग्निशमन दलाची दाेन वाहने आहेत. नवीन वाहन मंजूर झाले असून, ते उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठादारांना आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गडचिराेली न.प.कडे आग विझविण्यासाठी तीन गाड्यांची व्यवस्था राहणार आहे. देसाईगंज नगर परिषदेकडे दाेन अग्निशमन वाहने आहेत. अहेरी नगर पंचायतीकडे एक, तर सिराेंचा नगर पंचायतीकडे एक वाहन उपलब्ध आहे.

प्रत्येक तालुकास्तरावर अग्निशमन व्यवस्था बळकट असणे आवश्यक आहे. जिल्ह्याची भाैगाेलिक परिस्थिती व लांब अंतर लक्षात घेऊन देसाईगंज व गडचिराेली नगर परिषदेची व्यवस्था ताेकडी पडत आहे.

बाॅक्स...

अहेरी व सिराेंचात पद मंजुरीच नाही

- अहेरी व सिराेंचा नगर पंचायतीमध्ये प्रत्येकी एक अग्निशमन वाहन उपलब्ध आहे. मात्र, अग्निशमन दलाचे काम सांभाळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक आहे.

- या दाेन्ही नगर पंचायतींमध्ये राेजंदारी कर्मचाऱ्यांकडे अग्निशमन व्यवस्थेची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. या नगर पंचायतीमध्ये फायरमन, लिडिंग फायरमन, वाहनचालक व पर्यवेक्षक अशी कुठलीही पदे शासनाने अजूनही मंजूर केली नाहीत.

- गडचिराेली या मागास जिल्ह्याची अग्निशमन व्यवस्था मजबूत झाल्यास दरवर्षी जंगलाला आगी लागून हाेणारे माेठे नुकसान टळू शकते. त्यासाठी शासनाने प्रशिक्षित व नियमित कर्मचारी देणे आवश्यक आहे.

बाॅक्स...

डीपीसीकडून निधी मिळेना

- जिल्ह्यातील तीन नगर परिषद व नऊ नगर पंचायतींची यावर्षी काेराेना महामारीने करवसुली घटली आहे.

- आर्थिक अडचणीत असलेल्या या यंत्रणेला डीपीसीकडून निधी मिळण्यास विलंब हाेत आहे. पुरेसा निधी मिळाल्यास अग्निशमन व्यवस्था बळकट हाेईल.

बाॅक्स...

अग्निशमन विभागातील मंजूर आणि रिक्त पदे

गडचिराेली न.प.च्या अग्निशमन विभागात एकूण ९ पदे मंजूर आहेत. यापैकी ६ पदे भरण्यात आली असून, ३ पदे रिक्त आहेत. यामध्ये लिडिंग फायरमन १ आणि फायरमन २ ही महत्त्वाची पदेच अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत. देसाईगंज न.प.मध्ये ९ पदे मंजूर असून, ४ पदे भरली आहेत. लिडिंग फायरमन, फायरमन, वायरमन व पर्यवेक्षक आदी पाच पदे रिक्त आहेत.

बाॅक्स..

चार तालुक्यांत स्वतंत्र वाहने येणार

आरमाेरी नगर परिषद व चामाेर्शी नगर पंचायतीला प्रत्येकी एक अग्निशमन वाहन मंजूर झाले असून, यासाठी जिल्हा नियाेजन समितीतून निधी मिळणार आहे. या निधीतून वाहन उपलब्ध हाेणार आहे. धानाेरा, एटापल्ली न.पं.चाही वाहनांचा प्रस्ताव मंजूर आहे.

बाॅक्स...

लांब अंतराची वाहने निरुपयाेगी

गडचिराेली न.प.कडे अग्निशमन वाहन व्यवस्था आहे. चामाेर्शी, गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी या चार तालुक्यांत ही सेवा देता येते. लांब अंतरावर अहेरी उपविभागात वेळेवर वाहने पाेहाेचत नाहीत.

काेट....

गडचिराेली न.प. प्रशासनाकडे आगीचे संकट वेळीच आटाेक्यात आणून अग्निशमन व्यवस्था पुरविण्यासाठी उपलब्ध असलेली वाहने व कर्मचाऱ्यांमार्फत सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सद्य:स्थितीत ३० लाखांचा निधी उपलब्ध असून, या निधीचा वापर त्यासाठी केला जाणार आहे.

- अनिल गाेवर्धन, स्थानिक अधिकारी,

अग्निशमन विभाग, न.प., गडचिराेली

Web Title: Firefighters rely on untrained personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.