अखेर वरूणराजाची कृपादृष्टी

By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T01:14:28+5:302014-07-12T01:14:28+5:30

जून महिन्यात केवळ ५९ मिमी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारली. यामुळे जिल्ह्यात केवळ २९ टक्केच पेरण्या आटोपल्या होत्या.

Finally, Varunaraja's grace | अखेर वरूणराजाची कृपादृष्टी

अखेर वरूणराजाची कृपादृष्टी

गडचिरोली : जून महिन्यात केवळ ५९ मिमी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने महिनाभर दडी मारली. यामुळे जिल्ह्यात केवळ २९ टक्केच पेरण्या आटोपल्या होत्या. पेरलेले पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली होती. दरम्यान गुरूवारी रात्रीच्या सुमारास जिल्हाभरात दमदार पाऊस झाला.शुक्रवारी सकाळीसुध्दा पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्रीपासून तर शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्हाभरात एकूण १४७.६ मिमी पाऊस पडला. १४७.६ मिमी पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे. या पावसाची सरासरी १२.३ टक्के आहे. गडचिरोली तालुक्यात १७.२ मिमी, धानोरा तालुक्यात ७.३ मिमी, मुलचेरा तालुक्यात २ मिमी, देसाईगंज तालुक्यात ७ मिमी, आरमोरी तालुक्यात २३.८ मिमी, कुरखेडा तालुक्यात ५ मिमी, कोरची तालुक्यात ४२ मिमी, एटापल्ली तालुक्यात ७.४ मिमी, भामरागड तालुक्यात ९.७ मिमी, सिरोंचा तालुक्यात २६.२ मिमी, पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. गुरूवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने शेतीमध्ये पाणी साचले आहे. गडचिरोली शहरासह अनेक गावातील खोलगट भागात पाणी साचले होते. सकाळच्या सुमारास नागरिकांसह शाळकरी मुलांनी छत्र्यांचा आधार घेतला. पावसामुळे गडचिरोली शहरात नाल्या पाण्याने वाहत होत्या. एकंदरीतच या पावसामुळे शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. सिरोंचा व कोरची तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पाऊस बरसल्याने जिल्हाभरातील शेतकरी खतांची जुळवाजुळव करीत आहेत. काही शेतकरी पऱ्हे टाकण्याच्या तयारीत आहेत. पावसामुळे वातावरणात उकाडा कमी झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Finally, Varunaraja's grace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.