महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
By संजय तिपाले | Updated: August 27, 2025 17:12 IST2025-08-27T17:12:10+5:302025-08-27T17:12:50+5:30
गणेशोत्सवाच्या प्रारंभीच मोठी कारवाई : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात चकमक

Fierce encounter on Maharashtra border; 'C-60' force kills four Naxalites in heavy rain
गडचिरोली : लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच तिकडे भामरागडमध्ये छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात माओवाद्यांना सुरक्षा यंत्रणेला नुकसान पोहोचविण्यासाठी तळ ठोकला. मात्र, याची भनक लागताच जिल्हा पोलिसांच्या सी- ६० पथके व राज्य राखीव पोलिस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी २५ ऑगस्ट रोजी पहाटे संयुक्त मोहीम राबवून माओवाद्यांचे कटकारस्थान हाणून पाडत मोठे 'विघ्न' परतावून लावले. आठ तासांच्या धुमश्चक्रीत चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले असून घटनास्थळाहून शस्त्रास्त्रेही हस्तगत केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गडचिरोली- नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाच्या गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी
२६ ऑगस्ट रोजी अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० ची १९ पथके आणि राज्य राखीव दलाच्या शीघ्रकृती दलाची दोन पथके रवाना केली होती. मात्र, या भागात पाऊस हाेता, त्यामुळे अभियान राबविताना अडचण येत हाेता. २८ ऑगस्ट रोजी पहाटे अभियान राबविताना माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आठ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसरात शोध घेतला असता ४ जहाल माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यात एक पुरुष व तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून घटनास्थळाहून एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल व अन्य एक .३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा वर्धापनदिनी होता घातपाताचा कट
दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी कोपर्शी जंगल परिसरात माओवादी तळ ठोकून बसले होते. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होऊन २६ ऑगस्ट राेजी ४३ वर्षे पूर्ण झाले. जिल्हा वर्धापनदिनाच्या दिवशी घातपाती कारवाईचा माओवाद्यांचा कट असण्याची शक्यता आहे. मात्र, हा डाव जवानांनी उधळून लावला.
कोपर्शी जंगलात वर्षभरातील दुसरी मोठी कारवाई
यापूर्वी कोपर्शी जंगलात २१ ऑक्टोबर २०२४ रोजी माओवादी व जवानांत चकमक झाली होती. या चकमकीत दोन पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. दहा महिन्यांत याच जंगलात दुसऱ्यांदा अभियान राबवून जवानांनी चार माओवाद्यांचा खात्मा केला.