रेकी करण्यासाठी आला अन् अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:05 IST2025-09-14T14:04:07+5:302025-09-14T14:05:07+5:30

भामरागड तालुक्यातील  ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका जहाल माओवाद्याला विशेष पथकाच्या जवानांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली.

ferocious Maoist with a reward of two lakhs was arrested in gadchiroli | रेकी करण्यासाठी आला अन् अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास अटक

रेकी करण्यासाठी आला अन् अडकला; दोन लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यास अटक

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील  ताडगाव जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या एका जहाल माओवाद्याला विशेष पथकाच्या जवानांनी १३ सप्टेंबर रोजी अटक केली. शंकर भिमा महाका (३२, रा. परायनार, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. शासनाने त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
‎ 
‎शंकर महाका हा भामरागड दलमचा सदस्य असून २०१६ पासून माओवादी संघटनेत सक्रिय होता. त्याने सुरुवातीला जनमिलीशियामध्ये काम केले, तर २०२१ पासून तो थेट दलममध्ये दाखल झाला. गेल्या काही वर्षांत त्याने पोलिसांची माहिती गोळा करण्यासोबतच अनेक विध्वंसक कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे तपासातून उघड झाले. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत विशेष अभियान पथकातील जवानांचा सहभाग होता.

खून, जाळपोळ, स्फोटात सहभाग
शंकर महाका याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये २०२२ साली धोडराज-इरपनार मार्गावर पेनगुंडा रस्त्याच्या कामावरील तब्बल १९ वाहनांची जाळपोळ करण्याची घटना प्रमुख आहे. त्यात दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याशिवाय २०२३ मध्ये पेनगुंडा येथील एका निरपराध नागरिकाचा खून तसेच अन्य दोन गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपासावर असलेल्या एका खुनाच्या प्रकरणातही तो वाँटेड आरोपी होता.

‎विशेष अभियानातून अटक
‎भामरागड उपविभागातील ताडगाव ठाण्याच्या हद्दीत तिरकामेटा जंगल परिसरात पोलिसांचे दोन विशेष पथक गस्त घालत असताना हा संशयित इसम दिसला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तो जहाल माओवादी शंकर भिमा महाका असल्याचे उघड झाले.
‎‎
गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी अभियानात २०२२ पासून आतापर्यंत १०९ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. माओवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे.
‎- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Web Title: ferocious Maoist with a reward of two lakhs was arrested in gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.