शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
By Admin | Updated: June 23, 2014 23:51 IST2014-06-23T23:51:38+5:302014-06-23T23:51:38+5:30
पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये
कृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतीत
गडचिरोली : पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यात १७ जून रोजी पाऊस झाल्यानंतर पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे धानाच्या पेरणीची कामे खोळंबली आहेत. आठ दिवस होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्याचबरोबर दिवसा कडक उन्ह पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धान पिकाची पेरणी करावी की नाही, या गोंधळात शेतकरीवर्ग पडला आहे. चामोर्शी व अहेरी तालुक्यात सोयाबीन पिकाची पेरणी केली जात आहे. धान पिकाची पेरणी होत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. सर्वसाधारणत: २० ते २५ जूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे आगमन होते. त्यानंतर १ जुलैपासून पेरणीला सुरूवात होते. धान पिकाचे पऱ्हे १० जुलैपर्यत भरले तरी उत्पादनात घट होत नाही. त्यामुळे धान पिकाच्या पेरणीला आणखी १० ते १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पिकाची पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)