शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:50+5:30
पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य विलास कोरेटी, कृषी सहायक विकेश मडावी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानाची शेती ही खरीप हंगामातील सहा महिने कालावधीची शेती आहे. उर्वरित सहा महिने जमीन पडीत असते. शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दुबार पीक लागवड करणे आवश्यक आहे. धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसायावर भर द्यावा, असे प्रतिपादन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयंत टेंभुर्णे यांनी केले.
पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य विलास कोरेटी, कृषी सहायक विकेश मडावी आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेवगा पिकाची निवड करून रोपे उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्यानंतर आत्मा व कृषी विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळेत शेवगा लागवड करणे, पाणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग तसेच विक्री व्यवस्थापन आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
आत्मा, कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामात धानोरा तालुक्याच्या अनेक गावात शेतकºयांची शेतीशाळा घेण्यात आली. या शेतीशाळेत धानासोबतच विविध पिकांची लागवड पद्धती, रोग व कीड व्यवस्थापन, बियाणे, खतांचा वापर आदीसह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
उपयुक्त शेवग्यामध्ये औषधी गुणधर्म
शेवगा हे बहुआयामी औषधी गुणधर्म असलेले पीक आहे. शेवग्याच्या शेंगा, पाने व बिया उपयुक्त आहेत. शेवग्याच्या बियापासून तेल तयार करण्यात येत असून त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीमध्ये केला जातो. शेवग्याच्या झाडाच्या पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण दूर करण्यासाठी पोषक आहार म्हणून करण्यात येतो. बियांची पावडर पाणी शुध्दीकरण करण्यासाठी करण्यात येते तर शेंगा ह्या आपल्या दैनंदिन आहारामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे पीक वर्षातून दोनदा घेतल्या जाते. पीक हलक्या जमिनीमध्ये घेतले जात असून या पिकास पाणी खूप कमी प्रमाणामध्ये लागत असल्याने माळरानाच्या ठिकाणीसुद्धा शेवगाचे पीक घेता येऊ शकते. या पिकाच्या लागवडीसाठी खर्च बराच कमी येत असून उत्पन्न अधिक आहे. त्यामुळे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते, असे या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.