शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ नाही
By Admin | Updated: August 24, 2014 00:00 IST2014-08-24T00:00:10+5:302014-08-24T00:00:10+5:30
आरमोरी पं. स. अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर ८५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. आरमोरी पं. स. अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वडधा, देऊळगाव व आरमोरी कृषी मंडळ क्षेत्रात या बियाणांचे वाटप करावे,

शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ नाही
वैरागड : आरमोरी पं. स. अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के सुटीवर ८५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. आरमोरी पं. स. अंतर्गत येणाऱ्या वैरागड, वडधा, देऊळगाव व आरमोरी कृषी मंडळ क्षेत्रात या बियाणांचे वाटप करावे, असे निर्देश होते. परंतु आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सुटीवर आलेल्या धान्य बियाणांचा लाभ झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहिले आहेत.बियाणांचा लाभ न झाल्याने योजनेत गैर व्यवहार झाला असल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सुटीवरचे बियाणे अत्यल्प असले तरी त्या मंडळ क्षेत्रात हे बियाणे सेवा सहकारी संस्थांच्यामार्फतीने वाटप करण्यात येतील, अशी सूचना शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु सुटीवर आलेल्या धान्य बियाणांचा लाभ चालू वर्षात शेकऱ्यांना मिळाना नाही. आरमोरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी केली होती. परंतु केवळ ८५ क्विंटलच बियाणे मंजूर करण्यात आले होते. या बियाणांचा तालुक्यातील अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ झाला. ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदानावरील बियाणे पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाच्या या अनुदान योजनेविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. परिणामी बियाणांवरील अनुदान सुटीची योजना फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील काही मोजक्याच शेतकऱ्यांना बियाणांवरील अनुदान योजनेचा लाभ मिळाला. मात्र गरीब शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
सुटीवर आलेल्या धान्य बियाणांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, अशी कुजबुजही अनेक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी या योजनेत गैरव्यवहार केला असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सुटीवर मिळालेल्या धान्य बियाणाची चौकशी करून या प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)