जुन्या दस्तावेजांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: June 20, 2016 01:08 IST2016-06-20T01:08:13+5:302016-06-20T01:08:13+5:30
पंचायत समितीमधील जुने दस्तावेज वेळोवेळी झेरॉक्स काढण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे यातील बहुतांश दस्तावेजांची पाने फाटली आहेत.

जुन्या दस्तावेजांचे अस्तित्व धोक्यात
एटापल्ली पंचायत समितीमधील स्थिती : प्रमाणपत्रांसाठी जुने पुरावे म्हणून होतो उपयोग
रवी रामगुंडेवार एटापल्ली
पंचायत समितीमधील जुने दस्तावेज वेळोवेळी झेरॉक्स काढण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे यातील बहुतांश दस्तावेजांची पाने फाटली आहेत. अनेक दस्तावेज शेवटच्या घटका मोजत आहेत. या दस्तावेजांची वेळीच देखभाल न केल्यास ते पूर्णपणे फाटून त्यांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इंग्रजांच्या काळात गावातील कोतवाल गावात फिरून प्रत्येक व्यक्तीच्या जन्म, मृत्यू व जातीची नोंद करण्याचे काम करीत होते. त्यामुळे जुन्या दस्तावेजांवर आजोबा, वडील, पंजोबा यांच्या जन्म, मृत्यू व जातीविषयक नोंदी आहेत. आजच्या पिढीतील व्यक्तींना अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढायचे असल्यास जुन्या काळातील दस्तावेजांचा पुरावा आवश्यक आहे. सदर संपूर्ण दाखले पंचायत समितीमध्ये ठेवण्यात आली आहेत. मात्र पंचायत समितीचे प्रशासन सदर दस्तावेज व्यवस्थित ठेवलेले नाही. ६० वर्षांपूर्वीचा कागद आता फाटण्याच्या मार्गावर आहे. काही कागद फाटून त्यांचे तुकडे पडले आहेत. ते एकमेकाला जोडून त्यांचा अर्थ लावावा लागत आहे. १९५५ पूर्वीचे रेकॉर्ड तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जमिनीसंदर्भात महत्त्वाचा पुरावा समजला जाणारा पी-१ हा दस्तावेज भूमिअभिलेख कार्यालयात उपलब्ध होतो. या संपूर्ण दस्तावेजांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. नवीन प्रमाणपत्र काढण्याबरोबरच न्यायालयीन कामासाठीही हे दस्तावेज अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सदर दस्तावेज जपवणूक करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जास्तीतजास्त दिवस ते दस्तावेज ठेवण्यासाठी ते व्यवस्थित कापडामध्ये बांधून ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दस्तावेजांवर पाणी गळणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र विद्यमान प्रशासनाचे या महत्त्वाच्या दस्तावेजाकडे दुर्लक्ष झाले आहे. सदर दस्तावेज नष्ट झाल्यास भविष्यात नागरिकांसमोर फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंग करून ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.