आवलमरीतील पाण्याचे कुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:07 IST2019-05-05T00:06:48+5:302019-05-05T00:07:15+5:30
आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़

आवलमरीतील पाण्याचे कुंड
आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे कुंड येथील खास आकर्षण आहे़ हे कुंड तालुक्यात पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. आवलमरी गावातील हे पाण्याचे कुंड तालुक्यासह गडचिरोली जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यातील आदिवासींकरिता श्रद्धा, तर वैज्ञानिकांसाठी संशोधनाचे केंद्र बनले आहे. दरवर्षी आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपल्या आदिम देवीदेवतांचे येथे पूजन करतात. या कुंडाबाबत अनेक आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहेत. या आश्चर्यकारक कुंडाजवळ टाळी वाजविल्यास कुंडातील पाणी उकळल्यासारखे हलायला लागते. टाळीचा आवाज जितका जास्त असेल तितकी कुंडातील हालचाल देखील जलद गतीने होते. विशेष म्हणजे ही सर्व हालचाल केवळ पाण्याच्या आतील भागातच सुरू असते. वरील स्तरावर मात्र पाणी संथ दिसते. टाळी वाजविताच जणू गरम पाण्याला उकळी यावी तसे पाण्यात तरंग निर्माण होतात़ आदिवासी या कुंडातील पाणी उकळते असे सांगत असले तरी कुंडातील पाण्यात केवळ उकळी आल्यासारखा भास होतो. मात्र पाणी प्रत्यक्षात उकळत नाही. दरवर्षी या ठिकाणी आदिवासी मोठ्यासंख्येने एकत्र येतात तेव्हा या परिसरात जुन्या परंपरेनुसार कोंबडे, बोकडांचे बळी दिले जातात. मात्र आदिवासी नागरिक या कुंडात उतरण्याची आणि पाण्यास स्पर्श करण्याची परवानगी देत नाहीत. एवढे मात्र खरे की, पर्यटकांना निसर्गाची एक निराळीच किमया या ठिकाणी निश्चितच अनुभवण्यास मिळते. या ठिकाणी सुरुवातीला सहा ते सात कुंड होते. त्यावेळी त्यांचे आकार देखील मोठे होते. कालांतराने काही कुंड नाहीशे झाले. आता केवळ तीन -चार कुंड शिल्लक आहेत, असे या परिसरातील जुन्या पिढीतील नागरिक सांगतात. निसर्गाच्या या चमत्काराची कारणे वैज्ञानिक शोधत आहेत. मात्र हा तालुक्यातील दुर्गम भाग असल्याने त्यात अडचणी येत आहेत. येत्या काळात या कुंडाचे रहस्य नक्कीच उलगडेल अशी अपेक्षा आहे. हा भागात दुर्गम असल्याने येथे पर्यटकही कमी येतात़ घनदाट रानाची हिरवळ अनुभवत निसर्गाचा हा चमत्कार बघून पर्यटक आपसूकच नतमस्तक होतो़ आदिवासीबांधवांचे हे श्रद्धास्थळ पर्यटकांचे आकर्षणाचे स्थळ होणे आवश्यक आहे़
वैेज्ञानिक दृष्टीने आवलमरीचा कुंड संशोधनाचा विषय असला तरी आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचे स्थान आहे. दोन्ही बाबींचा विचार करून या स्थळाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल.