हत्तींची घुसखोरी, २० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 18:31 IST2021-11-28T18:26:14+5:302021-11-28T18:31:54+5:30
हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे २० शेतकऱ्यांच्या शेतात जमा असलेला धान, तूर पीक तसेच शेतातील जलवाहिन्यांच्या पाईपची ताेडफाेड केली. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

हत्तींची घुसखोरी, २० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून पिंपळगाव परिसरात हत्तींनी आपले बस्तान मांडले आहे. या परिसरातील जवळपास २० शेतकऱ्यांच्या पिकांचे व इतर साहित्यांचे नुकसान केले आहे.
महिनाभरापूर्वी धानोरा तालुक्यात दाखल झालेले हत्ती आता घाटी अरततोंडी जंगलातून वडसा वनपरिक्षेत्राच्या पिंपळगाव(ह) कक्ष क्र.१२३ येथे पाेहाेचले आहेत. या हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे वीस शेतकऱ्यांच्या शेतात जमा असलेला धान व तूर पीक तसेच शेतातील जलवाहिन्यांच्या पाईपची ताेडफाेड केली. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या कळपावर नजर ठेवून आहेत. लवकरच संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली. परिसरातील रहिवासी नागरिकांमधे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानटी हत्ती गावशेजारी असल्याने गावातील वस्तीवर हल्ला होण्याच्या भीतीने नागरिकांमधे दहशत निर्माण झाली आहे.
पिंपळगाव (ह) कक्ष क्र.१२३ येथे वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मागील दोन दिवसांपासून जंगल परिसरात गस्त घालत आहेत. नागरिकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाण्याच्या प्रयत्न करू नये किंवा हत्तींना त्रास होईल, ते चिडतील असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन यावेळी वनविभागाकडून करण्यात येत आहे.