कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या

By गेापाल लाजुरकर | Updated: April 27, 2025 03:13 IST2025-04-27T03:12:50+5:302025-04-27T03:13:08+5:30

चार दिवसांपासून वाकडी शेतशिवारात संचार : शिवणी परिसरात भरकटला हाेता कळप

Elephant stampede near Kripala village; Three women injured | कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या

कृपाळा गावाजवळ हत्तींचा धुडगूस; तीन महिला जखमी, थाेडक्यात बचावल्या


गडचिराेली : रानटी हत्तींचा कळप शुक्रवारी रात्री गुरवळा जंगल परिसरातून वाकडी व पुढे शिवणी परिसरात दाखल झाला. विश्रांतीसाठी जंगलक्षेत्र न मिळाल्याने कळप भरकटला. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी १०:३० च्या सुमारास पाेटफाेडी नदी परिसरात कपडे धुणाऱ्या पाच ते सहा महिला कळपाच्या कचाट्यात सापडल्याने यातील तीन महिला जखमी झाल्या. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखडे (४०) (सर्व रा. कृपाळा, ता. गडचिराेली) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.

गडचिराेली वन विभागातील वाकडी, म्हसली, कृपाळा, हिरापूर या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाचा संचार आहे. दरम्यान, शनिवार, २६ एप्रिल राेजी सकाळी हत्तींचा कळप भरकटला. सकाळी १०:३० वाजता हा कळप पाेटफाेडी नदी परिसरात आला. यावेळी नदीवर कृपाळा येथील सुशीला टेमसू मेश्राम, योगिता उमाजी मेश्राम, पुष्पा निराजी वरखडे या महिला कपडे धुत हाेत्या. हत्ती आल्याचे पाहून त्यांनी पळापळ सुरू केली. यावेळी तिन्ही महिला जखमी झाल्या. यापैकी याेगिता मेश्राम ह्या गंभीर जखमी झाल्या. तिन्ही महिला हत्तींच्या हल्ल्यात जखमी झाल्या की, जीवाच्या आकांताने पळताना जखमी झाल्या ही बाब चाैकशीनंतरच स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान, जखमी महिलांना गडचिराेली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी याेगिता मेश्राम यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविल्याची माहिती आहे.

हत्तींचा बंदाेबस्त न केल्यास आंदाेलन
कृपाळा, म्हसेली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रानटी हत्तींचा धुमाकूळ आहे. हत्तींनी मका, धान पीक व भाजीपाला पिकाची माेठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. आता हत्ती नागरिकांच्या जीवावरही उठले आहेत. त्यामुळे हत्तींचा लवकर बंदाेबस्त करावा, अन्यथा आंदाेलन केले जाईल, असा इशारा भाजपचे तालुका महामंत्री बंडूजी झाडे यांनी दिला आहे.

मक्यासह धान पिकाचेही नासधूस
तीन दिवसांपूर्वी हत्तींच्या कळपाने वाकडीचे माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या म्हसली येथील तीन एकर शेतातील पिकाची नासधूस केली. म्हसली येथील यशवंत झरकर यांच्या पिकाचेही नुकसान केले तसेच हिरापूरच्या चार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले हाेते. या भागात मका, धान व भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

तिन्ही महिलांची प्रकृती गंभीर नाही, सामान्य आहे. महिलांवर हत्तींनी कशाप्रकारे हल्ला केला, याबाबत चाैकशी केली जाईल. सध्या महिलांवर याेग्य उपचार करण्यावर वन विभागाकडून भर दिला जात आहे. अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
- मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिराेली

Web Title: Elephant stampede near Kripala village; Three women injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.