बैलबंड्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:28+5:30
पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव तीन ते चार हजार रुपये प्रतीब्रासवर पोहोचले आहेत.

बैलबंड्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांवर होणारी कारवाई टाळण्यासोबतच विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काही रेती तस्करांनी बैलबंड्यांच्या माध्यमातून रेतीची वाहतूक करणे सुरू केले आहे. बोरमाळा नदीघाटातून अशाच पद्धतीने होणारा रेती चोरीचा प्रयत्न हाणून पाडत गडचिरोली तहसील कार्यालयाने चार बैलबंड्या जप्त केल्या आहेत. प्रत्येक बंडीवर सुमारे ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव तीन ते चार हजार रुपये प्रतीब्रासवर पोहोचले आहेत. रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित ट्रॅक्टरवर १ लाख १३ हजार रुपयांचा दंड बसतो. त्यामुळे ट्रॅक्टर मालक प्रत्यक्ष नदीतून रेतीची चोरी करण्याची हिंमत करीत नाही. मात्र रेती तस्करीसाठी बैलबंडींचा वापर मात्र वाढला आहे.
गडचिरोली शहरापासून तीन किमी अंतरावर वैनगंगा नदी आहे. या नदीवरील बोरमाळा घाटावरून शहरात बैलबंडीच्या सहाय्याने मागील आठ ते दहा दिवसांपासून रेती आणली जात होती. याबाबतची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना मिळाली. त्यांनी कारगिल चौकात पाळत ठेवून रेती चोरी करणाऱ्या बैलबंड्यांवर जप्तीची कारवाई केली. या बैलबंड्यावर प्रत्येकी ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सर्व बंड्या रेतीसह तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. दंड भरल्यानंतरच त्यांना सोडले जाणार आहे.
सदर बंड्या गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील योगेश मधुकर धोडरे, सुधाकर बुधाजी धोडरे, विनोद तुळशिराम बारसागडे, ढिवर मोहल्ल्यातील अनिल माधव टिंगुसले यांच्या मालकीच्या आहेत.
ट्रॅक्टर मालक खातात मलाई
नदीघाटातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरात रेती आणताना पकडले जाण्याची भीती राहते. ट्रॅक्टर पकडले गेल्यास मोठा दंड ठोठावला जातो. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीतून रेती आणण्याची हिंमत ट्रॅक्टरमालक करीत नाही. बैलबंडी मालकांकडून २०० रुपये प्रती बैलबंडी या दराने रेती खरेदी केली जाते. एका विशिष्ट ठिकाणी रेती टाकून ढीग तयार केला जातो. त्यानंतर ट्रॅक्टर मालक ३५०० ते ४००० रुपये प्रतिट्रॅक्टर या दराने ती रेती शहरातील बांधकाम व्यावसायिकांना विकतात. यामध्ये प्रती ट्रॅक्टर दोन ते तीन हजार रुपयांची कमाई ट्रॅक्टरमालक करीत आहेत. हा गोरखधंदा गडचिरोली शहरात प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बैलबंडीने स्वत:च्या घरासाठी रेती नेली जात असावी, असा अंदाज महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी बांधत होते. मात्र बैलबंडीने रेती आणून तिची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बैलबंडी मालकही आता महसूल विभागाच्या रडारवर आहेत.