नदीत बुडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 26, 2014 23:27 IST2014-08-26T23:27:15+5:302014-08-26T23:27:15+5:30
आपल्या ५ मित्रासोबत आष्टी-चंद्रपूर मार्गावरील पुलानजिक वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी येथे सोमवारला

नदीत बुडून बालकाचा मृत्यू
आष्टी : आपल्या ५ मित्रासोबत आष्टी-चंद्रपूर मार्गावरील पुलानजिक वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी येथे सोमवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
छोटू पप्पू वर्मा रा. कानपूर (उत्तरप्रदेश) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आष्टी येथे गेल्या पाच महिन्यापासून १५ ते २० या वयोगटातील जवळपास १५ मुले नाक्याजवळ असलेल्या कांबळे यांच्या घरी खोली घेऊन भाड्याने राहत होते. सदर मुले आष्टी व गोंडपिंपरी परिसरातील आठवडी बाजारात दुकान लावून चिवळा, बर्फी, जिलेबी व समोसा आदी खाद्य पदार्थाची विक्री करीत होते. किरायाने राहत असलेले सारेच मुले दररोज वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी जात होते. नेहमीप्रमाणे आज सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास या गटातील ५ मुले आष्टी-चंद्रपूर मार्गालगत असलेल्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले. नदीपात्रात उतरल्यावर ते आंघोळ करू लागले. दरम्यान छोटू वर्मा हा आंघोळीच्या नादात खोल पाण्यात गेला. तो पाण्यात बुडूत असल्याचे दिसताच त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खोल पाण्यात दूरवर वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे छोटू हा नागपूर येथून आपल्या मावशीच्या घरून भेट घेऊन आष्टीला दोन-तीन दिवसासाठी आला होता. त्याचा मृतदेह सापडला नाही. (प्रतिनिधी)