वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे पाच वर्षांत लागली उद्यानाची 'वाट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:06 IST2024-12-02T15:03:23+5:302024-12-02T15:06:22+5:30
पर्यटकांचा हिरमोड : कन्नमवार जलाशयाच्या वन उद्यानाची दैना

Due to the lack of planning of the forest department, the park has been 'waiting' for five years.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोशी : तालुक्यातील घोट वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कन्नमवार जलाशय परिसरात सर्वसामान्यांसह पर्यटकांच्या दृष्टीने वनविभागाने वन उद्यान उभारले. मात्र, उद्यानाच्या देखभाल, दुरुस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दैनावस्था झाली आहे. केवळ पाच वर्षांतच या वन उद्यानाची वाट लागल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
घोट वनपरिक्षेत्राअंतर्गत रेगडी उपक्षेत्राचा समावेश आहे. याठिकाणी जिल्ह्यातील एकमेव कन्नमवार जलाशय आहे. या जलाशयाला भेट देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक येथे गर्दी करीत असतात. यापूर्वी या जलाशय परिसरात पर्यटकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. परिणामी लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने जलाशय संकुलात वन उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला.
याअंतर्गत पाच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून येथे उद्यान उभारण्यात आले. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध वन्यप्राण्यांचे पुतळे उभारण्यासह बालकांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य लावण्यात आले. बागेत विविध प्रकारची आकर्षक झाडेही लावण्यात आली. येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी विशेष आसन व्यवस्थाही करण्यात आली. वनविभागाच्या या उपक्रमाचे सुरुवातीला मोठे कौतुक झाले. वन उद्यानामुळे कन्नमवार जलाशय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळू लागली होती. मात्र, कालांतराने वनविभागाने वन उद्यानाच्या देखभाल, दुरुस्तीकडे कमालीचा कानाडोळा केला. उद्यानाच्या बकाल अवस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.
साहित्य झाले खराब, दुरुस्ती होईना
या उद्यानात गवत वाढले असून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच उद्यानातील साहित्याची काळजी न घेतल्याने हे साहित्य तूटफूट झाले आहे. एकंदरीत आजच्या स्थितीत या उद्यानाची बकाल अवस्था झाली आहे. आजही येथील कन्नमवार जलाशयाला भेट देण्यासाठी पर्यटक येत आहेत. मात्र, वनउद्यानाची अवस्था बघून नाराजीचा सूर उमटत आहे.