डीटीएड् पदवीधारक लागले शेतीकामाला

By Admin | Updated: July 19, 2014 01:12 IST2014-07-19T01:12:44+5:302014-07-19T01:12:44+5:30

शिक्षक बनण्याचा ध्यास ठेवून हजारो विद्यार्थ्यांनी

DTED graduates started farming | डीटीएड् पदवीधारक लागले शेतीकामाला

डीटीएड् पदवीधारक लागले शेतीकामाला

शिक्षकांची भरती प्रक्रियाही बंदच : अनेक अध्यापक विद्यालयांना लागले कुलूप
पुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज

शिक्षक बनण्याचा ध्यास ठेवून हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत निभाव न लागल्याने बेरोजगार झालेले डीटीएडधारक शेतीच्या कामाला लागले आहेत. डीटीएडधारकांना ‘मास्तर’ची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा डीटीएडकडे कल अत्यंत कमी झाला असून विद्यार्थ्यांअभावी अनेक अध्यापक विद्यालय बंद झाले आहेत. परिणामी सुरू असलेलेही अध्यापक विद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी डीएड म्हणजे, शिक्षकाची हमखास नोकरी म्हणून डीटीएडकडे पाहिले जात होते. १९७० ते १९८५ च्या काळात अध्यापनशास्त्राची पदविका घेतल्यानंतर हमखास शिक्षकाची नोकरी मिळत होती. पुढे १९९० पासून राज्य शासनाने शेकडोंच्या संख्येत खासगी अध्यापक विद्यालयांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली. अध्यापक विद्यालयाची निवड करताना ३० टक्के उमेदवार व्यवस्थापन कोट्यातून निवडण्याचे अधिकार अध्यापक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले होते. यावेळी नोकरीच्या हव्यासापोटी कमी टक्केवारी असलेल्या व केंद्रीय फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांना व्यवस्थापन कोट्यातून संधी मिळत होती. उमेदवार दोन ते अडीच लाखापर्यंत पैसे भरून डीटीएड पदविका पूर्ण करीत होते. यानंतर राज्य शासनाने अध्यापक विद्यालयांना मान्यता देणे सुरूच ठेवल्याने कालांतराने डीटीएड पदविका घेतलेल्या बेकारांची फौज निर्माण झाली. राज्य शासनाने राज्यात शिक्षक भरतीसाठी २००९-२०१० मध्ये सीईटी परीक्षा घेतली होती. त्यानंतर मागील वर्षात टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो डीटीएडधारकांनी परीक्षेसाठी आवेदन दाखल करून परीक्षा दिली. परंतु या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागला. टक्केवारीच्या अर्हतेमध्ये जिल्ह्यातील मोजकेच डीटीएडधारक टीईटीत उत्तीर्ण झाले. संपूर्ण विदर्भाचा निकाल ५ टक्केच्या आतच होता. त्यामुळे डीटीएडधारकांच्या अडचणी वाढल्या असून बेरोजगारांची फौज निर्माण होत आहे. परिणामी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता डीटीएडला पाठ दाखवित आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षक पदभरतीची प्रक्रिया बंद आहे. शाळा पटपडताळणीमध्ये राज्यभर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तीच स्थिती जि.प.ची असून जिकडे तिकडे समायोजन प्रक्रिया होत आहे. त्यामुळे डीटीएडधारकांचे मास्तर होण्याचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच राहणार आहे, हे निश्चित. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड झालेला विद्यार्थी शेतीकामाच्या हंगामावर रोजंदारीने मिळेल ते काम करीत आहे. अनेक डीटीएडधारक बाहेर जिल्ह्यात कामाच्या शोधात जात आहे. तर बाहेर राज्यातही रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या ही कमी नाही. परिणामी अनेक अध्यापक विद्यालय विद्यार्थी मिळत नसल्याने बंद झालीत.
शासनाने वेगळी सीईटी परीक्षा घेण्यापेक्षा पात्रता विषय म्हणून सीईटीला स्वतंत्र डीटीएडमध्ये विषय म्हणून ठेवला असता तर पुन्हा नव्याने ही पात्रता परीक्षा द्यावी लागली नसती. शिक्षक बनण्यासाठी आपल्याला एवढी धडपड करावी लागली नसती.
- अब्दुल शेख, डीटीएडधारक

Web Title: DTED graduates started farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.