बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

By Admin | Updated: August 12, 2014 23:46 IST2014-08-12T23:46:06+5:302014-08-12T23:46:06+5:30

बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस

Drought conditions in Ballarpur taluka | बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व इतर पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुढे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नापिकी होण्याची शक्यता बळकावली आहे.
मागील वर्षी बल्लारपूर तालुक्यात ७०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र यावर्षी पाऊस ३०० मि.मी. झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के पाऊस कमी आहे. बल्लारपूर तालुक्यात नऊ हजार हेक्टर शेती पिकाखाली असून त्यात तीन हजार हेक्टर धान, सोयाबीन तीन हजार ५०० हेक्टर, कापूस ८०० हेक्टर, तूर ३०० हेक्टर, भाजीपाला २०० हेक्टर व इतर पिके ५०० हेक्टरमध्ये घेण्यात येतात. यंदा ९० टक्के धान पीक घेण्यासाठी भात रोपाची निर्मिती शेतकऱ्यांनी केली. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्के रोवणी झाली आहेत. सध्या सोयाबीन, कापूस व तूर या पिकांची स्थिती चांगली आहे.
मात्र पुढे पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास पिके करपून नष्ट होण्याची भीती आहे. सध्या धान रोपे वाचविण्याची कसरत शेतकरी करीत आहे. नाल्याशेजारी असलेले तसेच विहिर सिंचनाची सोय असलेले शेतकरी कसेबसे धान पऱ्हे वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र वातावरणात उकाडा वाढला आहे. सूर्य आग ओकत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. अशात धान पऱ्हे वाचविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. पावसाअभावी धान पऱ्हे करपली जात आहेत.

Web Title: Drought conditions in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.