जिल्ह्यात राकाँ ‘प्रायव्हेट लिमिटेड’
By Admin | Updated: August 13, 2014 23:50 IST2014-08-13T23:50:55+5:302014-08-13T23:50:55+5:30
पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे, अशी थेट तक्रार माजी आमदार

जिल्ह्यात राकाँ ‘प्रायव्हेट लिमिटेड’
गडचिरोली : पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबाचा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे, अशी थेट तक्रार माजी आमदार हरिराम वरखडे यांनी राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे केली. तटकरे यांनी विश्रामभवनात पक्षाच्या वरिष्ठ व जुन्या नेत्यांशी पक्षस्थितीबाबत औपचारिक चर्चा केली.
यावेळी विभागीय पक्षनिरीक्षक किशोर माथनकर, गडचिरोली जिल्हा निरीक्षक शब्बीर विद्रोही आदींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार हरिराम वरखडे, बाबा हाशमी, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, श्याम धाईत, जयदेव मानकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरिराम वरखडे व श्याम धाईत यांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात पक्ष रसातळाला गेला आहे, हे स्वत: व स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांसाठीच पक्षाचा कार्यक्रम राबवित आहे, अशी थेट तक्रार सुनिल तटकरे यांच्याकडे केली. आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा मतदार संघ राकाँकडे देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी तटकरे यांच्याकडे करण्यात आली. या बाबीला धर्मरावबाबा आत्राम यांनी आक्षेप नोंदवित गडचिरोली विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे तटकरे यांच्या समक्ष या दोनही नेत्यांना सुनावले. त्यानंतर वरखडे, आत्राम व धाईत यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली, अशी माहिती आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम लोकमतशी बोलताना म्हणाले की, आपण आरमोरी विधानसभा क्षेत्रातही अपक्ष म्हणून उमेदवारी लढवावी, अशी सूचना प्रदेशाध्यक्षांना केली होती. राकाँला पुढे मुख्यमंत्री पदासाठी सोयीचे होईल, असे म्हणालो. (जिल्हा प्रतिनिधी)