धान पिकावर रोगांचे आक्रमण
By Admin | Updated: August 23, 2014 23:59 IST2014-08-23T23:59:48+5:302014-08-23T23:59:48+5:30
मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने वाढत्या उष्णतामानामुळे धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरेगाव परिसरात उष्णतेमुळे करपा,

धान पिकावर रोगांचे आक्रमण
कोरेगाव/चोप : मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने वाढत्या उष्णतामानामुळे धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरेगाव परिसरात उष्णतेमुळे करपा, गाद, खोड किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे धान पीक संकटात सापडले आहे. शिवाय पावसाअभावी अनेक शेतामध्ये वाळवी लागल्याने धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी ८ ते १० गावांमधील शेतकऱ्यांच्या पोळा सणावर धान पिकावरील रोगामुळे विरजन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाअभावी उष्णतामानात वाढ होऊ धान पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पोळा सण अगदी तोंडावर असतांना कीटकनाशके घ्यावे की, पोळा सण साजरा करावा, अशी द्विधास्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. रोजीरोटी करून पोळा सणासाठी गोळा केलेले पैसे शेतकरी आता कीटकनाशके खरेदी करण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा महत्वपूर्ण सण असलेला पोळा यंदा कोरडाच जाणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे रोग व पावसाअभावी शेतकरी हतबल झाला आहे.
कोरेगाव परिसरात धान पिकावर करपा, खोड किडीचा प्रादुर्भाव झाला असून अनेक धानपीक रोगांच्या आक्रमणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. पिकांना पाण्याची व्यवस्था करावी की रोगांपासून पिकांचे रक्षण करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरेगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी विभागामार्फत सुटीवर कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक उपलब्ध होत नसल्याने पीक संवर्धनासाठी केवळ मोफत सल्ला देणाऱ्या कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न झाल्यास रोगांमुळे धानपीक पूर्णत: नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. परिणामी अगदी तोंडावर असलेल्या पोळा सणावर शेतकऱ्यांचा निरूत्साह भारी पडण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने पुढाकार घेऊन कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना खत व कीटकनाशकांचा सुटीवर पुरवठा करावा, अशी मागणी कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)