चौकशी कमिटीच्या गठणावरच स्थायी समितीत चर्चा
By Admin | Updated: August 21, 2014 23:52 IST2014-08-21T23:52:16+5:302014-08-21T23:52:16+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी समितीचे गठण करण्याच्या मुद्यावरून गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. दोन मुद्यांवर चौकशी

चौकशी कमिटीच्या गठणावरच स्थायी समितीत चर्चा
गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामात झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी समितीचे गठण करण्याच्या मुद्यावरून गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. दोन मुद्यांवर चौकशी समित्यांचे गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास काम करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडणीय आकारणी कामाच्या विलंबाबत केली जात आहे. हा दंड रद्द करण्यात यावा, अशी मागणी अनेक सदस्यांनी लावून धरली. कायद्याच्या चौकटीत राहून या संदर्भात प्रशासकीय निर्णय घेतला जाईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत मुलचेरा तालुक्यात विहीर बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर घोळ झाला आहे. एकाच विहिरीचे अनेक काम विविध छायाचित्र काढून दाखविण्यात आले आहे व शासनाच्या लाखो रूपयाची उचल करण्यात आली. या संदर्भात चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतमार्फत सदर कामे झाले असले तरी यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. तसेच कुरखेडा येथील पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याच्या कामाचीही चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर अभियंत्याने मागील बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांवरही आरोप केले होते. या पार्श्वभूमिवर ही चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. अनेक कंत्राटदारांवर काम विलंबाने केल्या कारणावरून बांधकाम विभाग दंडाची आकारणी करीत आहे. ही आकारणी रद्द करण्याची मागणीही आजच्या बैठकीत अनेक सदस्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)