आश्रमशाळा कर्मचाऱ्यांत असंतोष
By Admin | Updated: July 24, 2014 23:51 IST2014-07-24T23:51:18+5:302014-07-24T23:51:18+5:30
गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये १२ जुलैपासून बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली आहे.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांत असंतोष
गडचिरोली : गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये १२ जुलैपासून बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. २१ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात रविवारला सुटीच्या दिवशी आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकदा बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी नोंदविण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शासकीय, अनुदानित व वसतीगृहांच्या कार्यप्रणालीत पारपदर्शकता यावी या हेतूने प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी बायोमॅट्रीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. तसेच त्यांनी २१ जुलै २०१४ रोजी परिपत्रक काढून सर्व कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रीक मशीनवर हजेरी नोंदविणे अत्यावश्यक केले आहे. याबाबतचे परिपत्रक प्रकल्प कार्यालयाने सर्व अनुदानित, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांना पाठविले आहे. या परिपत्रकात सोमवार ते शुक्रवार या दिवशी मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपीक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा परिचर यांना येण्याची वेळ सकाळी १०.३० व जाण्याची वेळ सायंकाळी ५ वाजता अशी ठेवण्यात आली असून बायोमॅट्रीक मशीनवर यावेळी हजेरी नोंदविणे बंधनकारक केले आहे. शिक्षकांसाठी सकाळी १०.४५ ही येण्याची वेळ असून सायंकाळी ५ वाजता जाण्याची वेळ आहे. बायोमॅट्रीक यंत्रातील उपस्थितीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन व विद्यार्थ्यांचे दैनंदिन अन्नधान्य, निर्वाह भत्ता वितरित करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद आहे. रविवारीसुध्दा आश्रमशाळातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकदा बायोमॅट्रीक मशीनमध्ये हजेरी नोंदविणे बंधनकारक केले आहे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने शाळा करून अनेक शिक्षक बाहेरगावी जातात. मात्र रविवारी हजेरी नोंदविणे बंधनकारक केल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)