दिव्यांगांना व्यवसायासाठी मिळणार मोफत 'व्हेइकल'; लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:13 IST2025-01-29T14:12:27+5:302025-01-29T14:13:44+5:30
Gadchiroli : सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांगांना कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे

Disabled people will get free 'vehicle' for business; 100 percent subsidy to beneficiaries
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे १० जून २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर योजनेंतर्गत दिव्यांगांना रोजगारनिर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, हा उद्देश आहे. २.२५ लाख रुपयांचे मोबाईल व्हेइकल या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी ६ फेब्रुवारीची अंतिम मुदत
योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून करण्यात आली असून, दिव्यांग व्यांग व्यक्तींकडून ६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
पोर्टलवर सुविधा
दिव्यांगांना फिरते वाहन योजनेचा लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in या लिंकवर अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सदर लिंकवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे पोर्टल उघडले जाते. त्यानंतर अर्ज भरण्याची सुविधा यात देण्यात आली आहे.
अशा आहेत अटी, शर्थी
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले किमान ४०% दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र असावे, अर्जदार १ जानेवारी २०२४ या दिनांकाच्या दिवशी १८ ते ५५या वयोगटातील असावा.
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत पालक अर्ज करण्यास सक्षम असतील, दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक नसावे, अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारल्यास परवानाधारक नसलेल्या अतितीव्र व्दिव्यांगाच्या सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.