ग्रामसेवकांचा धडक मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 01:28 IST2014-07-01T01:28:28+5:302014-07-01T01:28:28+5:30
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर

ग्रामसेवकांचा धडक मोर्चा
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान येथील आयटीआय चौकातून जिल्हाभरातून शेकडो ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
या मोर्चाचे नेतृत्व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, सहसचिव पुरूषोत्तम बनपुरकर, सरचिटणीस प्रदीप भांडेकर यांनी केले. मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठविणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दिलेल्या निवेदनात ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात याव्या, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ, कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत रूजू झालेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारीपद निर्माण करण्यात यावे, वेतनासोबत ३ हजार रूपये प्रवासभत्ता देण्यात यावा, सर्व संवर्गाकरिता बदल्यांचे धोरण एकच ठेवावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, विस्तार अधिकारी संघटना, जिल्हा परिषद नर्सेस संघटना, जिल्हा महिला समिती आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला. या मोर्चात ग्रामसेवक संघटनेचे कायदे सल्लागार विजय पत्रे, विभागीय संघटक निलकंठ धानोरकर, शंकर कुनघाडकर, जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जि. प. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, जिल्हा महिला समितीच्या सचिव माया बाळराजे आदी सहभागी झाले होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना उमेशचंद्र चिलबुले म्हणाले, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांचे सेवाविषयक, प्रशासकीय प्रश्न तसेच वेतनश्रेणीचा प्रश्न शासनासोबत वारंवार सकारात्मक चर्चा करूनही मार्गी लागले नाही. यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील ग्रामसेवक वर्गांमध्ये शासनाप्रती तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे ग्रामसेवकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. शासनाने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उमेशचंद्र चिलबुले यांनी यावेळी दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. (स्थानिक प्रतिनिधी)