धानोरात मोर्चा व चक्काजाम
By Admin | Updated: August 19, 2014 23:42 IST2014-08-19T23:42:17+5:302014-08-19T23:42:17+5:30
बिगर आदिवासी जनतेसाठी अन्यायकारक असलेला पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आदीसह

धानोरात मोर्चा व चक्काजाम
धानोरा : बिगर आदिवासी जनतेसाठी अन्यायकारक असलेला पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून वर्ग ३ व ४ च्या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी मंगळवार धानोरा येथे बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील बसस्थानक चौकात धानोरा तालुक्यातील जवळपास दीड हजार बिगर आदिवासी नागरिक जमले. त्यानंतर तब्बल १ तास चक्काजाम करण्यात आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान संतप्त बिगर आदिवासी नागरिकांनी शासनाच्याविरोधात तीव्र शब्दात नारेबाजी केली. त्यानंतर बसस्थानक चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. या मोर्चात बिगर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी रमेश चौधरी, संदीप लांजेवार, भाऊसाहेब मडके, मलिक बुधवानी, गजेंद्र डोमळे, गजानन भोयर, नाना पाल, मुन्ना चंदेल, राजू मोहुर्ले, राजू रामपुरकर, कपील म्हशाखेत्री, साजन गुंडावार, शारीफ शेख, अफरोज शेख आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. बिगर आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार मडावी यांना दिले. या आंदोलनादरम्यान धानोरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनात दुर्गम भागातील नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)